राज्य सरकार कोणत्याही सणाविरुद्ध नाही, तर कोरोनाच्या विरोधात – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ठाणे : राज्य सरकार हे कोणत्याही सणाविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे. कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, त्याला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत त्याचे पालन करावेच लागेल, असे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच केंद्रानेदेखील या सणांच्या दरम्यान संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करून राज्य सरकारला काळजी घ्यायला सांगितले आहे, याची आठवणही करून दिली.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गोकुळाष्टमीचा सण साधेपणाने साजरा करत ‘आरोग्य उत्सव’ साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज ठाणे शहरातील ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, महापौर नरेश म्हस्के यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, दहीहंडीचा उत्साह आणि इतर उत्सव याला काही काळासाठी आपण मुकलो आहोत याची जाणीव आहे. पण आज गर्दी करून उत्सव साजरी करण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोनाचे संकट दिसत असताना आरोग्य विषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. हे खूप दुर्देवी आहे. हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेले आंदोलन नाही हेही त्यांनी लक्षात घ्यायला हवे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. केंद्र सरकारने दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात गर्दी टाळावी असे राज्याला पत्र पाठवून कळवले आहे. जे आंदोलन करू इच्छितात त्यांना केंद्र सरकारचे  हे पत्र आपल्याला दाखवायचे आहे.

ऑक्सिजन प्रकल्पाविषयी…

प्रताप सरनाईक फाउंडेशन व विहंग चॅरिटेबल ट्रस्टने – ठाणे शहरात, रेमंड कंपनी समोर, विहंग पाम क्लब येथे हा कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांट उभारला आहे. आज (३१ ऑगस्ट) गोपाळकाल्याचे आयोजन न करता हा ऑक्सिजन प्लांट लोकांच्या सेवेसाठी अर्पण केला गेला. हा ऑक्सिजन  प्लांट लोकांसाठी २४ तास सुरु राहील. रिकामे सिलेंडर घेऊन येणाऱ्या नागरिकांना भरलेले ऑक्सिजन सिलेंडर येथून दिले जाईल. तसेच ज्यांच्याकडे सिलेंडर नसेल त्यांना डिपॉजिट घेऊन मोफत ऑक्सिजन सिलेंडर देण्यात येणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: