शिवाजी सावंत हे युगंधर साहित्यिक   : प्रा. मिलिंद जोशी

पुणे : समकालीन जीवनाची रूपे साहित्यातून मांडताना लेखकाला आव्हानाला तोंड द्यावे लागत नाही असे नाही.  परंतु तेथे त्याला आजूबाजूच्या परिसराचा  सामाजिक रूप-रस-गंध-ध्वनी यांचा आधार लाभलेला असतो. अशा वेळी वाचकांच्या कल्पनाशक्तीला जागृत करून त्यांना झुलवत ठेवण्याचे आव्हान तुलनेने सोपे असते. पण जो काळ लेखकाने आणि वाचकाने दोघांनीही पाहिलेला आणि अनुभवलेला नाही.  पण जो  पूर्वसुरींच्या अभिजात साहित्यकृतीतून आणि इतिहासाच्या पानापानातून धुक्याचे अनेक पदर लपेटून उभा आहे, तो विश्‍वसनीयरित्या वाचकांसमोर उभा करणे हे मोठे आव्हान असते. ते सावंतांनी समर्थपणे पेलले म्हणूनच ते ‘युगंधर साहित्यिक’ आहेत असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेत शिवाजी सावंत यांच्या ८१ व्या जयंती निमित्त कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या वतीने मृत्युंजय या कादंबरीच्या तिसाव्या आवृत्तीचे आणि मृत्युजंय, छावा आणि युगंधर कादंबऱ्यांच्या डिलक्स आवृत्तीचे प्रकाशन प्रा. जोशी यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कॉन्टिनेन्टलच्या अमृता कुळकर्णी, कार्यवाह उद्धव कानडे, बंडा जोशी, दीपक करंदीकर, सतीश देसाई, लक्ष्मण राठिवडेकर यावेळी उपस्थित होते.

प्रा. जोशी म्हणाले, ‘जिथे संघर्ष, नाट्य आणि  उपेक्षा आहे अशा व्यक्तिमत्वाबद्दल शिवाजीरावांना कुतूहल होते. कादंबरी कशी लिहावी याची शिस्त त्यांनी स्वत:ला लावून घेतली होती. जे काही सांगायचे ते विस्तृत,सविस्तर अशीच त्यांची रीत होती. त्यामुळे त्यांनी त्रोटक, आटोपशीर असे काही लिहिले नाही. मानवी इतिहासातील महापुरूषांच्या सामर्थ्यांचा आणि मर्यादांचा वेध घेण्याची क्षमता या चितंनशील साहित्यिकामध्ये होती.

लोकप्रियता हे कोणत्याही साहित्यकृतीच्या श्रेष्ठतेचे गमक ठरत नसते, ही वस्तुस्थिती असली तरी लोकप्रिय कलाकृतींची केवळ उपेक्षाच करणेही योग्य नाही. वास्तविक पाहता ‘मृत्युंजय’ सारख्या साहित्यकृती समीक्षकांच्या चिंतनाला आव्हान देणार्‍या असतात.  त्यांचा विचार करताना  साहित्यकृतीच्या श्रेष्ठतेचे  नवे निकषही सापडू शकतात.

शिवाजीरावांचा उल्लेख ऐतिहासिक आणि पौराणिक कादंबरीकार  म्हणून केला जातो. परंतु त्यांची लेखणी पुराण, इतिहास आणि वर्तमान अशा तीनही काळांना स्पर्श करणारी होती. अशा या थोर साहित्यिकाने मृत्युंजय, छावा, युगंधरसारख्या महाकादंबर्‍यांचे लेखन करून मराठी साहित्यशारदेचा दरबार श्रीमंत केला

Leave a Reply

%d bloggers like this: