fbpx

वितरण व्यवस्था सक्षम करण्यावर भर द्यायला हवा – अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक

पुणे : ”भारतीय अर्थव्यवस्थेत उत्पादनाचा नाही, तर वितरण व्यवस्थेचा मुख्य प्रश्न आहे. कोरोनाच्या काळात वितरण व्यवस्थेतील त्रुटी आपण पाहिल्या. त्यामुळे अर्थव्यवस्थेला प्रगतीपथावर न्यायचे असेल, तर शिक्षण, गुंतवणूक या क्षेत्राखालोखाल आपल्याला वितरण व्यवस्था सक्षम करण्यावर भर द्यायला हवा. विजेपासून कृषी उत्पादनापर्यंत आणि गृहोपयोगी वस्तूंपासून शिक्षणापर्यंत सर्वच क्षेत्रात वितरण व्यवस्था सक्षम होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत,” असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी केले.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) कमिटी फॉर मेम्बर्स इन इंडस्ट्री अँड बिझनेस (सीएमआयबी) आणि पुणे ‘आयसीएआय’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सीएफओ-सीईओ’ संवाद सत्रात चंद्रशेखर टिळक बोलत होते. पुणे स्टेशनजवळील हॉटेल शेरेटॉन ग्रँड येथे शनिवारी झालेल्या कार्यक्रमावेळी ‘आयसीएआय’ केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, ‘सीएमआयबी’चे चेअरमन सीए हंस राज चुग, व्हाईस चेअरमन सीए दुर्गेश काबरा, विभागीय समिती सदस्य सीए यशवंत कासार, पुणे ‘आयसीएआय’चे अध्यक्ष व खजिनदार समीर लड्डा, माजी अध्यक्ष सीए अभिषेक धामणे, सीए ऋता चितळे आदी उपस्थित होते. उद्योग क्षेत्रातील ३०० पेक्षा जास्त मुख्य वित्तीय अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रत्यक्ष व ऑनलाईन माध्यमातून उपस्थित होते.
चंद्रशेखर टिळक म्हणाले, “भारतीय अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा तुलनेने फारसा परिणाम झालेला नाही. शिवाय, भारताची लोकसंख्या आणि भौगोलिक आकार यामुळे सेवा व उत्पादन क्षेत्रात मोठी उपलब्धी आहे. याचा वापर जागतिक बाजारपेठेत झाला, त्याची निर्यात वाढवली, तर भारताला त्याचा फायदा होईल. गेल्या अनेक वर्षातील सातत्यपूर्ण आर्थिक धोरणामुळे विदेशी गुंतवणुकीसाठी भारत महत्वाचे केंद्र ठरत आहे. संरक्षण, अवकाश संशोधन यामध्ये मोठी गुंतवणूक होत आहे. अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्यासाठी हे उपयुक्त आहे.”
“कोरोनामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ संकल्पना रुजली आहे. अर्थव्यवस्थेत बदल आणणारा हा घटक आहे. गेल्या काही महिन्यात वेतनातील अनिश्चिततेमुळे गुंतवणुकीकडे त्यातही विशेषतः शेअर बाजाराकडे अनेक लोक वळले आहेत. दीड वर्षात एक कोटीपेक्षा जास्त डीमॅट खाते उघडले गेले असून, व्यवहारही होत आहेत. येणाऱ्या काळात आर्थिक, कामगार, शैक्षणिक धोरणे आखताना या घटकांचा अंतर्भाव करणे गरजेचे आहे. सनदी लेखापालांनी यामध्ये महत्वाची भूमिका बजावावी,” असेही चंद्रशेखर टिळक यांनी नमूद केले.

Leave a Reply

%d bloggers like this: