प्रशासकीय अधिका-यांनी लोकसेवक म्हणून काम करायला हवे – विवेक वेलणकर

पुणे : आज प्रत्येक क्षेत्रामध्ये माझे पोट कसे भरेल, ही भावना दिसून येते. जनता ही राजा आहे, हे केवळ वाक्य म्हणून शिल्लक राहिले आहे. एमपीएससी आणि युपीएसएसीच्या माध्यमातून अनेकजण प्रशासकीय अधिकारी होतात. मात्र, त्यावेळी समाजाला न विसरता लोकसेवक ही भावना मनात ठेऊन अधिका-यांनी समाजातील लोकांसाठी काम करायला हवे, असे मत सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी व्यक्त केले.

अहमदनगरमधील पाथर्डी येथील सुधा बाळासाहेब ढाकणे ही दिव्यांग  विद्यार्थिनी पुण्यात एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करत आहे. कोविडच्या काळात स्वत:चा  दैनंदिन खर्च भागवणे देखील शक्य नसल्याची व्यथा तिने निरंजन सेवाभावी संस्थेकडे मांडली. त्यामुळे निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे तिचा शैक्षणिक, निवास, साहित्य व भोजनाचा सर्व खर्च उचलण्यात येत असून तिला २५ हजार रुपयांची मदत नवी पेठेत झालेल्या कार्यक्रमात  देण्यात आली. यावेळी संस्थेचे डॉ.नवनीत मानधनी, धीरज धूत, स्वप्नील देवळे, दुर्गेश चांडक, अभय जाजू, ब्रह्मानंद लाहोटी, विनोद राठी आदी उपस्थित होते.

विवेक वेलणकर म्हणाले, आरटीआय कायदा होऊन १६ वर्षे उलटून गेली. तरी देखील आज प्रशासकीय अधिका-यांचे याबाबत प्रशिक्षण घ्यावे लागत आहे, हे दुर्देव आहे, असे सांगत प्रशासकीय अधिकारी व कार्यालयांमध्ये कशा प्रकारे अनेक बाबतीत अनास्था आहे, हे देखील त्यांनी सांगितले.

सुधा ढाकणे म्हणाल्या, कोविडमधील परिस्थितीनंतर नव्याने कशा प्रकारे सुरुवात करावी, हा प्रश्न माझ्यासमोर होता. माझ्या घरचे शेतकरी असून आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे निरंजन संस्थेने दिलेल्या मदतीचा मी नक्कीच सदुपयोग करीन आणि भविष्यात इतरांना मदत देण्याच्या पात्र होईन.

डॉ.नवनीत मानधनी म्हणाले, कोविड काळात आपण माणुसकी विसरलो आणि माणुसकी शिकलो देखील. त्यामुळे गरजवंत आणि दानशूर यांच्यामधील दुवा होण्याचे काम निरंजन संस्था करीत आहे. शिक्षण हा आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा घटक असून शिक्षणासाठी गरजूंना मदत करण्याचे काम संस्था करीत असल्याचे त्यांनी सांगितले. अभय जाजू यांनी सूत्रसंचालन केले. स्वप्नील देवळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: