fbpx

शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आग्रा ते राजगड गरुडझेप मोहिमेतील मावळ्यांचा सन्मान

पुणे : रणशिंगाची ललकारी…  जय शिवाजी… जय भवानीचा मर्दानी जयघोष… अशा भारावलेल्या वातावरणात शिवशाहीच पुण्यात पुन:श्च अवतरली. निमित्त होते, आग्रा ते राजगड गरुड झेप मोहिम २०२१ मध्ये सहभागी मावळ्यांच्या सत्कार सोहळ्याचे. शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या विश्वातील पहिल्या भव्य अश्वारुढ स्मारकापाशी गरुडझेप मोहिमेचे पुण्यातील पहिले स्वागत शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले.

यावेळी स्मारकापाशी शिवजयंती महोत्सव समितीचे आद्य प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, जेष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे, आमदार राहुल कुल तसेच शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यातील अनेक स्वराज्य घराणी उपस्थित होती. यावेळी गायकवाड यांच्या हस्ते अखंड भारताच्या स्वाभिमानाचे प्रतीक शिवरायांचा जिरेटोप देऊन मारुती गोळे व सहका-यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर गायकवाड व गरुड झेप मधील मावळ्यांच्या हस्ते शिवज्योत ही शिवस्मारकापासून लालमहालपर्यत रणशिगांच्या ललकारीत शिवरायांच्या जयघोषात पायी नेण्यात आली.

पांडुरंग बलकवडे म्हणाले, शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाला अनेक पदर, अनेक अविश्वसनीय घटना आहेत. त्यातील एक म्हणजे आग्रााहून सुटका. राहुल कुल म्हणाले, भारताच्या गौरवशाली इतिहासाचा जागर करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.
अमित गायकवाड म्हणाले, शिवरायांची आग्राहून सुटका या अविस्मरणीय घटनेचा चित्तथरारक इतिहास हा केवळ महाराष्ट्रालाच नव्हे, तर भारताला अनुभवण्यास दिल्याबद्दल गोळे आणि त्यांच्या सहका-यांचे भारतभरातीलच नव्हेतर विश्वभरातील शिवभक्त आभारी आहेत. पुढच्याच वर्षी या मोहिमेस १००० मावळे सहभागी होतील आणि एक दिवस हा संपूर्ण मार्ग महिला धावत पूर्ण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवराय आग्रा येथून निसटले, या घटनेला तब्बल ३५५ वर्ष झाली. या घटनेचे स्मरण दरवर्षी व्हावे, म्हणून मारुती आबा गोळे यांच्या संकल्पनतून आग्रा ते राजगड ही पायी मोहिम आखण्यात आली आहे. १७ आॅगस्टला मोहिमेची सुरुवात आग्रा येथील शिवरायांच्या स्मारकापासून झाली आणि २८ आॅगस्टला ही मोहिम पुण्यात पोहचली. त्यावेळी पहिले स्वागत समितीतर्फे करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन समीर जाधवराव, सचिन पायगुडे, संतोषराजे गायकवाड, सागर पवार, प्रवीण गायकवाड, किरण शितोळे, मोहन पासलकर, महेंद्र भोईटे यासह असंख्य स्वराज्यबांधवांनी केले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: