कालिदासांच्या ‘मेघदूता’ मध्ये समग्र जीवनदर्शन – मंगला गोडबोले

पुणेः- सुमारे पंधराशे ते सोळाशे वर्षांपूर्वी  कालिदासांनी निर्माण केलेले साहित्य आजही साहित्यिक, कवी आणि कलावंतांच्या प्रतिभेला आवाहन देते. कारण कालिदासांच्या ‘मेघदूता’मध्ये समग्र जीवनाचे दर्शन होते, असे मत ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केले.

आम्ही नूमवीय 62 तर्फे आयोजित विश्वनाथ राजपाठक लिखित आणि कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘रे सावळ्या घना’ या कादंबरीचे प्रकाशन गोडबोले यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मंजिरी धामणकर, लेखक विश्वनाथ राजपाठक, कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या संचालिका देवयानी कुलकर्णी-अभ्यंकर, आम्ही नूमवीयचे अध्यक्ष डॉ. गोविंद मराठे, आनंद नवाथे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंगला गोडबोले म्हणाल्या की, कवयित्री शांता शेळके, सी.डी. देशमुख, कुसुमाग्रज यांच्यासारखे अनेक प्रतिभावन साहित्यिक कालिदासांच्या ‘मेघदूत’ या साहित्य कृतीवर त्यांच्या नजरेतून अभिव्यक्त झाले आहेत. कालिदासांच्या मेघदूत या साहित्यकृतीवर अश्लीलतेचा अनाठायी ओरखडा उमटवला जातो. पण या साहित्य कृतीतील शृंगारीक वर्णने ही अश्लीलता नसून उत्कटता आहे. अलीकडचा समाज भलत्याच विषयाच लाज बाळगतो आणि नको त्या विषयात कोडगेपणा दाखवतो. कालिदासांच्या मेघदुतावरून मानवी प्रतिभेची ताकद अफाट असल्याचे अधोरेखित होते. कालिदास आणि त्यांच्या साहित्य कृतींच्या अस्तित्वाविषयी आजही अनेत सिद्धांत मांडले जातात. ‘मेघदूता’ हे मंदाक्रांता या वृत्तात लिहिलले 110 कडव्यांच्या श्लोकांचे खंडकाव्य आहे.
यावेळी बोलतांना मंजिरी धामणकर म्हणाल्या की, मूळ मेघदूत हे संस्कृत प्रचुर असल्याने ते आजच्या पिढीला वाचायला जड जाते. त्याचा आस्वाद त्यांना घेता येत नाही. मेघदूतामध्य वर्णन केेलेला श्रृंगार हा केवळ शारीरिक संबंध या उत्छृंखल व्याख्येभोवती गुंफलेला नसून श्रृंगाराला कला आणि रतीक्रीडेचा दर्जा दिलेला आहे. शरीर सुखाच्या पलीकडचा श्रृंगार यात मांडलेला आहे. आप्त तृप्ती आणि आत्म तृप्ती सुंदर मिलाफ या काव्यात आहे. कारण हा शृंगार पंचेंद्रेयां पलीकडे जाणारा आहे.
लेखक विश्वनाथ राजपाठक आणि प्रकाशिका देवयानी कुलकर्णी- अभ्यंकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद नवाथे यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: