डॉ.प्रदीप डिकोस्टा, मल्लिका अय्यर, अमोल पांगारे यांना यंदाचा शौर्य पुरस्कार
पुणे : समाजात कोविडच्या काळात स्वत:च्या व कुटुंबाच्या आरोग्याची पर्वा न करता शौर्य गाजवित अचंबित करणारी कामगिरी करणा-या पुण्यातील डॉ.प्रदीप डिकोस्टा, मल्लिका अय्यर व अमोल पांगारे यांना यंदाचा शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. न-हे येथील डॉ.सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे स्वातंत्र्यदिनाच्यानिमित्ताने शौर्य पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर यांनी दिली.
कार्यक्रमाला ब्रिगेडियर प्रसाद जोशी (निवृत्त), संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, शिंदेशाही पगडी असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याचे यंदा तिसरे वर्ष आहे.
अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, यंदाचा शौर्य पुरस्कार केईएम रुग्णालयातील डॉ.प्रदीप डिकोस्टा यांना देण्यात येणार आहे. अतिदक्षता विभागातील व्यवस्थापन या विषयाची विशेष आवड असणा-या डॉ. डिकोस्टा यांनी आपल्या वीस वर्षांहून अधिक काळाच्या अनुभवाने या क्षेत्रात महत्त्वाचा ठसा उमटविला आहे. अतिदक्षता विभागातील उपचार आणि व्यवस्थापन या विषयात त्यांनी विशेष अभ्यास करतानाच या क्षेत्राला मार्गदर्शन करण्यासाठी पाठ्यक्रम तयार केला. विविध रूग्णालयांमध्ये अतिदक्षता विभागाचे प्रमुख म्हणून वैद्यकीय सेवा बजावतानाच ते भारतभरातील विविध महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण देणारे सन्माननीय प्राध्यापकही आहेत. त्यांनी कोविड काळात मोलाचे कार्य केले आहे.
दुस-या पुरस्कारार्थी केईएम हॉस्पिटलमधील वैद्यकीय क्षेत्रात समाजकार्याचा वेगळा ठसा उमटविणा-या सुंदरी उर्फ मल्लिका अय्यर. गेल्या ३१ वर्षांपासून त्या केईएम रूग्णालयात नोकरी करत आहेत. आपल्या नेमून दिलेल्या कामात कोणतीही कमतरता न ठेवता त्यांनी स्वत:चे सामाजिक संपर्काचे जाळे विणले आहे. त्या माध्यमातून त्यांनी रक्तदान शिबिर, मूकबधिर दिव्यांगांना मदत, लेप्रसी रूग्णांना विविध प्रकारे मदत केली आहे.
तर, तिसरे पुरस्कारार्थी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पांगारे. कोरोनाकाळात वेळू गाव तसेच पंचक्रोशी परिसरात कोविड रुग्णांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी अमोल पांगारे तत्पर राहिले. या आजाराबाबत प्रबोधन करतानाच जीवनावश्यक वस्तूंसह सर्व प्रकारची मदत ग्रामस्थांपर्यंत पोहचविली. आॅक्सिजन, व्हेंटिलेटर बेड ज्या दवाखान्यात आहे, तेथील प्रशासनाशी संपर्क साधून रुग्णांना दाखल करून अनेकांचे प्राण वाचवण्यात यश मिळवले. त्यामुळे त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना गौरविण्यात येणार आहे.
