Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

‘हंट्समन’कडून चाकण प्राथमिक आरोग्य केंद्रात’मल्टिपर्पज हेल्थकेअर फॅसिलिटी सेंटर’ची उभारणी

पुणे : उत्पादन क्षेत्रात जागतिक स्तरावर कार्यरत हंट्समन इंडिया कंपनीने चाकणजवळील कारंज विहिरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (पीएचसी) उभारलेल्या बहुपयोगी अत्याधुनिक वैद्यकीय केंद्राचे  (मल्टिपर्पज हेल्थकेअर फॅसिलिटी) लोकार्पण शुक्रवारी झाले. या केंद्रामुळे या भागातील लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. याचे रूपांतर लसीकरण केंद्र, बाह्यरुग्ण विभागात करत स्त्रिया व लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यावर भर दिला जाणार आहे.

या केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, हंट्समन इंटरनॅशनल (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडच्या भारतीय उपखंड विभागाचे व्यवस्थापकीय संचालक राहुल टिकू, साईट हेड आशिष बधे, सीएसआर प्रमुख रायोमंद सब्बावाला, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री महाजन, कारंज विहीरे गावाचे सरपंच यांच्यासह हंट्समन कंपनी व आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राहुल टिकू म्हणाले,“या बहुपयोगी केंद्रासाठी कारंज विहिरे प्राथमिक आरोग्य केंद्राशी सहयोग केल्याचा आम्हाला अभिमान आहे. हंट्समन अंतर्गत, तसेच भवतालच्या परिसरात राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्याप्रती बांधील आहे. सध्याच्या सेवांशिवाय, भविष्यकाळात या सुविधा केंद्राचे अधिक सर्वांगीण वैद्यकीय केंद्रात सहज रूपांतर केले जाऊ शकते. आमच्या भागातील समुदायांच्या आरोग्य व कल्याणाला तसेच सहयोगींच्या सुरक्षिततेला नेहमी प्राधान्य देतो. चाकण आणि आजुबाजूच्या खेड्यांमधील लोकांसाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल.”

डॉ. जयश्री महाजन म्हणाल्या, “या भागातील ३४ खेड्यांमधील एक लाखांहून अधिक लोकांना सेवा देण्याची क्षमता या केंद्रात आहे. गरोदर स्त्रियांना गर्भाची जन्मपूर्व चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल आणि नियमित बाह्यरुग्ण विभागातील सेवा दिल्या जातील. ३,५०० चौरस फुटांच्या भव्य जागेत पसरलेले हे आस्थापन कोविड-१९ लसीकरण केंद्राला भेट देणाऱ्यांसाठी प्रतीक्षाकक्ष म्हणूनही उपयोगात आणले जाणार आहे.”

शरद बुट्टे पाटील यांनी हन्ट्समन इंडियाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. या भागातील लोकांच्या कल्याणासाठी कंपनीने नेहमीच पुढाकार घेतला असून, अनेक समाजोपयोगी कार्य उभारले आहे. शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीत त्यांच्याकडून यापुढेही असेच चांगले कार्य होत राहील, असे बुट्टे पाटील यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading