Tuesday, June 16, 2026
BLOGLatest News

काँग्रेसमध्ये काही घडतंय – बिघडतंय…!

पंजाबमधील काँग्रेसमधील अंतर्गत कलह काही काळापुरता का होईना थंड झाला. गेल्या निवडणूकीच्या अगोदर भाजपाची खासदारकी सोडून काँग्रेसमध्ये डेरेदाखल झालेले नवज्योतसिंह सिद्धू आतापर्यंत नॉनस्ट्रायकर एंडला खेळत होते.कॅप्टन अमरिंदरसिंग हे मुख्यमंत्रीपदाचे पॅडस् बांधून धुवाँधार बॅटींग करीत असताना सिद्धूसारख्या कसलेल्या फलंदाजाला नॉनस्ट्राईकर एंडला केवळ समोरच्या फलंदाजाचा खेळ बघत क्रीझवर थांबावे लागले होते. परिणामी सिद्धू यांची चुळबूळ वाढली होती. यासोबतच पंजाब काँग्रेसमध्ये मोठ्या बंडाळीची बीजे पडू लागली होती. सध्याच्या काळात काँग्रेसच्या हातात अगदी शंभर टक्के असणाऱ्या बोटावर मोजणाऱ्या राज्यांपैकी पंजाब हे एक राज्य आहे. त्यामुळे तेथे तातडीने सुधारणा-दुरुस्ती करणे अतिशय आवश्यक होते. सत्तेचे संतुलन कायम ठेवण्यासाठी अखेर सिद्धू यांना पंजाब काँग्रेसचे अध्यक्षपद सोपविण्यात आले. या नव्या बदलासाठी कॅप्टन अनुकूल नव्हते परंतु तरीही पक्षश्रेष्ठींनी गेल्या काही वर्षांनी अभावानेच दाखविलेले खमकेपणा येथे दाखविला आणि कॅप्टन साहेबांची तलवार म्यान झाली. पंजाबच्या घटनाक्रमाने काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहत असून त्यांची दिशा योग्य देखील असल्याचे मानले जात आहे.

सध्याच्या काळात काँग्रेस आपल्या अतिशय वाईट काळातून जात आहे. सतत दोन लोकसभा निवडणूकांमध्ये तीन आकडी संख्या गाठण्यात काँग्रेसला अपयश आले.याशिवाय कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, मणीपूर या राज्यांमध्ये हातात आलेली सत्ता टिकविण्यात अपयश आले. नेतृत्त्वाच्या बाबतीत काही महिने निर्नायकी कारभार व पक्षश्रेष्ठींच्या जवळचे अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केलेला अशी स्थिती असताना काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी नेतृत्वाला आव्हान देण्यास सुरुवात केली होती. काँग्रेसची एवढी दारुण अवस्था तिच्या स्थापनेपासून कधीही झाली नव्हती. या काळात देशातील सर्वात जुना पक्ष अखेरच्या घटका मोजतोय की काय अशी चर्चा सुरु झाली होती. याचा थेट परिणाम काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनोधैर्यावर होत होता.
परंतु काँग्रेसच्या अंतर्गत पातळीवर अलिकडच्या काळात बरंच काही घडलं. नेतृत्वाच्या विरोधात बंड पुकारण्याच्या पवित्र्यात असणाऱ्या जी-२३ गटाच्या नेत्यांना जो संदेश द्यायचा तो देण्यात आला.काँग्रेसला आपल्या ठराविक पोथीनिष्ठ भूमिकेतून बाहेर येऊन मोठी डागडुजी करावी लागणार होती.त्यासाठीची तयारी पुर्ण झाली असून आता त्यादृष्टीने पावले पडत आहेत. महाराष्ट्रात भाजपाची खासदारकी भोगून काँग्रेसमध्ये परतलेले नाना पटोले यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे सोपविण्यात आली. नाना पटोले यांनी वापरलेले फंडे वेगळे असले तरी त्यामुळे राज्यातील मरणासन्न अवस्थेतील पक्षसंघटनेत चैतन्य आणले हे नाकारता येणार नाही. तिकडे उत्तरांचलमध्ये आगामी निवडणूकीच्या तोंडावर हरीश रावत यांच्यासारख्या ज्येष्ठ व जनाधार असणाऱ्या नेत्याला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे आणताना गणेश गोदियाल या तरुण नेत्याकडे प्रदेशाध्यपदाची जबाबदारी सोपविली आहे. गोदियाल हे गढवाल या भागातून येतात शिवाय ते ब्राह्मण समाजाचे आहेत दुसरीकडे प्रीतम सिंह या अनुसूचित जातीच्या नेत्याकडेही महत्वाची जबाबदारी असून उत्तरांचलमध्ये चार कार्यकारी अध्यक्ष दिले आहेत. उत्तरांचलमधील जातीय राजकारणाचा हा समतोल साधण्याची ही कृती २०१४ पुर्वीच्या काँग्रेसपेक्षा वेगळी आहे.महाराष्ट्रातही जुन्या-नव्याचा सुवर्णमध्य साधताना प्रदेश कार्यकारिणीत अतिशय महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर तेलंगणाचं देखील घेता येईल. आपल्या सुरुवातीच्या काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या भाजपाप्रणीत विद्यार्थी संघटनेत सक्रीय असणाऱ्या रेवंथ रेड्डी यांना नुकतेच तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमण्यात आले आहे. तेलंगणात त्यांनीही पक्षसंघटनेत चैतन्य आणण्याचे काम सुरु केले आहे.काँग्रेसमधील या नव्या नियुक्त्या पक्षाच्या मानसिकतेत झालेल्या बदलाकडे अंगुलीनिर्देश करीत आहेत.

गेल्या काही दिवसांतली काँग्रेसच्या नेतृत्वाकडून सातत्याने कार्यकर्त्यांना प्रेरीत करण्याचा कार्यक्रम सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अलिकडेच केलेल्या एका भाषणाकडे पाहता येईल. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपाचा पदर पकडला आणि ते केंद्रात मंत्री झाले. उत्तर प्रदेशात जतीन प्रसाद यांनीही काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपाची वाट पकडली. हे दोन्ही नेते राहुल यांच्या अतिशय जवळच्या बैठकीतील होते. परंतु त्यांनी तरीही पक्षाला अतिशय अडचणीच्या काळात सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे एकंदर राहुल यांचीच पक्षावरील मांड सुटलीय अशी चर्चा जोर धरु लागली होती. या काळातच राहुल यांनी कार्यकर्त्यांसमोर बोलताना, भाजपा नाही तर भाजपाची मातृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर थेट प्रहार करुन “जे संघाला घाबरतात, संघाबाबत ज्यांच्या मनात श्रद्धा आहे त्यांनी खुशाल काँग्रेस सोडावी. पण ज्यांना संघाच्या विचारांच्या विरोधात संघर्ष करायचा आहे, लढा द्यायचा आहे त्यांनी आमच्यासोबत यावं”, असे आवाहन केले. या आवाहनामध्ये ज्योतिरादित्य सिंधिया आणि जतीनप्रसाद यांच्या वाटेने जाणाऱ्यांना थेट संदेश दिला. यासोबतच ऊठ-सूट पक्षनेतृत्वाला आव्हान देणाऱ्या जी-२३ च्या बहुतांश दरबारी बुजुर्गांनांही थेट संदेश दिला आहे.पक्षश्रेष्ठीच्या दरबारात हुजरेगिरी करुन जनाधार असणाऱ्या नेत्यांवर राज्य करण्यात आयुष्य काढलेल्या जुन्या खोडांना या संघर्षाच्या काळात त्यांची नेमकी उपयुक्तता काय व किती आहे हे दाखवून दिलं असं मानलं जात आहे.

कोणत्याही बुजुर्ग नेत्याला सोबत न घेता पंजाबचा तिढा काँग्रेसने सोडविलेला आहे.पंजाबची ही घडामोड पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी दिलासादायक बाब असून काँग्रेसमध्ये सध्या काय सुरु आहे याची झलक देणारी आहे.तिसऱ्या आघाडीच्या चर्चा सुरु झाल्या तेंव्हा काँग्रेसला वगळून मोदींचा पाडाव करणे शक्य नाही याची कठोर जाणीव करुन देण्याइतपत काँग्रेसने या चर्चेत आपले स्थान कायम ठेवले. यानंतर नुकतेच तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसश्रेष्ठींची भेट घेतली. त्यांची ही भेट आगामी राजकीय गणितांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. ममता बॅनर्जी यांचे निवडणूकीतील रणनीतीकार प्रशांत किशोर हे लवकरच काँग्रेसमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. कदाचित त्यांच्याकडे अतिशय महत्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. प्रशांत किशोर यांचा समावेश मागच्या वेळेसच होणार होता, परंतु त्यावेळी ते काही कारणास्तव टळले. आता त्यांच्या प्रवेशाची पार्श्वभूमी तयार करण्यात आली असून राहूल आणि प्रियंका यांच्या पुढाकाराने हे सर्व होत आहे. काँग्रेसमधील बदलांच्या या नोंदी आहेत. या नोंदी अतिशय महत्वाच्या असून २०२४ च्या निकालांवर व पर्यायाने या देशाच्या भवितव्यावर दूरगामी परिणाम करणाऱ्या आहेत. म्हणूनच त्यांची दखल घेण्याची गरज आहे.

– गिरीश लता पंढरीनाथ, मुक्त पत्रकार

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading