दुर्गम भागातील संपर्क तुटलेल्या पूरग्रस्त कोकणवासियांना परतानी प्रतिष्ठानतर्फे अन्नधान्य
पुणे : कोकणातील पोलादपूर मधील दुर्गम भागातील सुतारवाडी व सडे गावातील पुरग्रस्तांचा बंधारा व पूलाचा काही भाग वाहून गेल्याने सगळ्यांशी संपर्क तुटला. वीज, पिण्याचे पाणी आणि अन्नधान्य नसल्याने उपासमारीची वेळ या डोंगरांवरील तीन गावांवर आली. त्यामुळे संपर्क तुटलेल्या या दुर्गम भागातील कोकणवासियांना परतानी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी धाव घेत अन्नधान्य व पिण्याच्या पाण्याची मदत प्रत्यक्ष तेथे जाऊन दिली आहे.
स्व.सौ.मंगला परतानी सेवा प्रतिष्ठान, मंगळवार पेठ, पुणे व अॅड.नितीन परतानी मित्र परिवारतर्फे पोलादपूरमधील दुर्गम भागातील सुतारवाडी, सडे सारख्या तीन गावांत ही मदत देण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातून ५० अन्नधान्य किट व २५० लीटर पाणी असे टेम्पो भरुन मदतीचे किट तेथे नेले होते.
अॅड.नितीन परतानी म्हणाले, कोकणामध्ये सध्या अतिवृष्टीमुळे अनेक गावात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्य गावांमध्ये मोठया प्रमाणात मदत मिळत आहे. मात्र, वाडया वस्त्यांवर मदत पोहोचत नाही. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील पोलादपूरमधील दुर्गम भागातील सुतारवाडी व सडे गाव ज्यांचा गेल्या आठवड्यापासून पुरामुळे वीज पुरवठा , मोबाईल रेंज बंद आहे व पूल वाहुन गेल्याने इतरांशी संपर्क तुटलेला आहे, अशा पुरग्रस्तांना अन्नधान्य, पिण्याचे पाणी, मेणबत्त्या इ.मदत आम्ही केली आहे. संस्था व कॉंग्रेस कार्यकर्ता म्हणून हे मदत कार्य सुरु राहणार असून ज्यांना या कार्याकरीता मदत द्यायची आहे, त्यांनी ९८२२१९८६१९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
