सुवर्ण पदक विजेती मिराबाई चानू होणार पोलीस अधिक्षक
मुंबई : ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला मीराबाई चानूने रौप्य पदक मिळवून दिले. इतकेच नव्हे तर टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताकडून वेटलिफ्टिंगमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली. तिच्या या कामगिरीनंतर आता मणिपूर सरकारने तिला पोलीस विभागात अतिरिक्त पोलीस अधिक्षक म्हणून काम करण्याची संधी देण्याचे ठरविले आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मणिपूर सरकारने मिराबाईला हे पद देण्याची तयारी दर्शविली आहे.
एन बिरेन सिंग यांनी मिराबाई चानू रौप्यपदक घेऊन घरी परतल्यानंतर तिच्यासोबत झालेल्या संवादाचा व्हिडीओही शेअर केला होता. “तू यापुढे रेल्वे स्थानक किंवा ट्रेनमध्ये तिकीट गोळा करायची गरज नाही,” असे मुख्यमंत्री मिराबाई चानूला व्हिडीओत सांगत होते. “मी तुमच्यासाठी एक विशेष पोस्ट राखीव ठेवत आहे,” असे आश्वासन त्यांनी मिराबाईला दिले होते.
चानूने भारताच्या खात्यावरील २९व्या ऑलिम्पिक पदकाची नोंद केली. कर्णम मल्लेश्वरीने २०००च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले होते. त्यानंतर वेटलिफ्टिंगमध्ये भारतीय क्रीडापटूने मिळवलेले हे दुसरे पदक आहे. भारतीय क्रीडापटूने मिळवलेले हे १८वे वैयक्तिक ऑलिम्पिक पदक ठरले. भारतीय महिला क्रीडापटूने मिळवलेले हे सहावे ऑलिम्पिक पदक ठरले.
