पुण्यासह सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट
पुणे:आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला असला, तरी धोका कायम आहे. आज पुण्यासह सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील आणखी चोवीस तास कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा धोका कायम आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाशी शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा धोका देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
बुधवारी मध्यरात्रीपासून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसानं अक्षरशः थैमान घातलं आहे. कमी वेळेत झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यातील नद्या, नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत. तर पंचगंगा, वाशिष्ठी आणि कृष्णा नदीनं तर धोक्याची पातळी देखील ओलांडली आहे. त्यामुळे शहरी भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं असून पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. असं असलं तरी मागील दोन दिवसांच्या तुलनेत आज परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचं दिसत आहे. काही ठिकाणी पुराच्या पाण्याच्या पातळीतही घट झाली आहे.
