आषाढी एकादशी – पंढपुरात संचारबंदी लागू, 2 हजार 300 पोलिसांचा बंदोबस्त

सोलापूर – पंढरपूर आषाढी वारीसाठी केवळ चारशे वारकऱ्यांनाच परवानगी दिलेली असताना बंदोबस्तासाठी मात्र 2 हजार 300 पोलिसांची फौज तयार करण्यात आली आहे. 144 कलमानुसार संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पंढरपूर शहराबरोबरच नदीपात्र व घाट परिसरात मोठ्या संख्येने पोलिसांची गरज असून हा बंदोबस्त वारकऱ्यांसाठी नाही तर संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी असल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले.

करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचीच बंदोबस्तासाठी नियुक्ती केली गेली आहे. आषाढी एकादशीदिवशी पहाटे 2.20 ते 3.30 या वेळेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची शासकीय पूजा होणार आहे. श्री विठ्ठल मंदिरात पुजेसाठी उपस्थित राहणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्यासमवेतील अन्य व्हीआयपी व्यक्तींना वगळता धार्मिक विधी पार पाडणाऱ्या पुजाऱ्यांबरोबरच इतर सर्व वारकऱ्यांना करोना आरटीपीसीआर चाचणीचे निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.

आषाढी वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात होणारी गर्दी लक्षात घेता करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शनिवारपासून 25 जुलै रोजीच्या सायंकाळी चार वाजेपर्यंत पंढरपूर शहर व गोपाळपूर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पंढरपूर आषाढी वारी सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस व आरोग्य विभाग सज्ज झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पंढरपूर शहर व गोपाळपूर वगळता भटुंबरे, चिंचोळी भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, वाखरी, कोर्टी, गादेगाव, शिरढोण, कौठाळी आदी गावांमध्ये मात्र 18 ते 22 जुलैपर्यंत संचारबंदी राहणार आहे. सुरुवातीला एक दिवस आणि नंतर दोन दिवस असे एकूण तीन दिवस या गावांना संचारबंदीतून वगळण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: