अण्णाभाऊंनी साहित्यातून वैश्विक तत्वज्ञान मांडले – डाॅ.श्रीपाल सबनीस
पुणेः-अण्णाभाऊ साठे यांना एका जाती पुरता आणि लाल, निळा, भगवा अशा कोणत्याच रंगात बुचकाळू नका, आण्णाभाऊ साठे यांनी केवळ एक दिवस शाळा करुन संपूर्ण जगाला उमगेल आणि उमजेल असे वैश्विक तत्वज्ञान त्यांच्या साहित्यातून मांडले, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाॅ.श्रीपाल सबनीस यांनी आज मांडले.
पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या सांस्कृतिक विभागातर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त लोककलेच्या माध्यमातून प्रबोधन करणा-या आणि अण्णाभाऊ यांच्या साहित्यातील विचार आणि तत्वज्ञानाचा प्रचार-प्रसार करणा-या लोककलाकारांचा सत्कार सबनीस यांच्या हस्ते आज करण्यात आला त्यावेळी सबनीस बोलत होते.
यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, राष्ट्रवादी काॅंग्रसचे प्रदेश सरचिटणीस रविंद्र माळवदकर, काँग्रेस सदस्य मिलिंद अहिरे, नगरसेविका लता राजगुरु, कुणाल राजगुरु, सागर काकडे, रिपब्लिकन युवा मोर्चाच्या सुवर्णा डंबाळे, ज्येष्ठ गझलकार म.भा.चव्हाण आदी उपस्थित होते.
डाॅ.श्रीपाल सबनीस म्हणाले, ज्या प्रमाणे ज्ञानेश्र्वरांनी पसायदानाच्या माध्यमातून संपूर्ण विश्वाचे हित मागितले, जसे युनोने जाहीरनाम्या द्वारे संपूर्ण मानवजातीच्या भल्याची कल्पना मांडली त्याच परिप्रेक्ष्यातून अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या साहित्यातून भूमिका मांडली आहे. अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिमत्व एका वर्तुळा पुरता नक्कीच मर्यादित नाही. त्यांचा जन्म मातंग समाजात झाला असला तरी ते केवळ मातंग समाजापुरता मर्यादित नव्हते. ते महाराष्ट्र, भारतापुरता मर्यादित नव्हते. लोकनाट्य आणि तमाशा या सारख्या लोककलांच्या मार्फत या मराठी मातीतील अण्णाभाऊ साठे या साहित्यीकांने त्याच्या साहित्य पताका साता समुद्रपार फडकवली. अण्णाभाऊ साठे हे कम्युनिस्ट होते आणि काँग्रेस आणि कम्युनिस्टांचे सख्य नव्हते तरी सर्व इझमच्या भिंती ओलांडून आण्णाभाऊ साठे यांनी त्यांनी मांडलेल्या मानवतावादी भुमिकेमुळे सर्वांना आपलेसे केले होते. केवळ डफलीवरील थापेने आण्णाभाऊ साठे यांनी अवघा महाराष्ट्र चेतवला आणि प्रेरित केला. मानवतेच्या आणि भावनेच्या धाग्याने अण्णाभाऊ साठे यांनी अवघा मानवजात गुफंली.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सांस्कृतिक विभागप्रमुख विठ्ठल गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सुत्रसचंलन केले.
