नातवाने केला साहित्यप्रेमी आजोबांच्या अखेरच्या इच्छेचा सन्मान
पुणे : त्याचे आजोबा वासुदेव वि. जोशी ऐंशीच्या दशकात महाराष्ट्र साहित्य परिषदेत कार्यक्रमाच्या निमित्ताने नियमित येत. त्यांचा परिषदेवर विशेष लोभ होता. ते लेखक होते. त्यांच्या कथा रोहिणी, माहेर या मासिकातून प्रसिद्ध झाल्या होत्या. शं. ना. नवरे, वि. ग. कानिटकर आणि रंगा मराठे या साहित्यिकांशी त्यांचा स्नेह होता. त्यांची तीन चार पुस्तकेही प्रकाशित झाली. त्यांनी त्यांच्या मुलालाही परिषदेचे आजीव सभासद केले होते. त्यांनी आजीसाठी तरतूद केलेल्या रकमेतील २५,५५१/- रु. ची रक्कम तिच्यानंतर साहित्य परिषदेला देणगी म्हणून द्यावी अशी त्यांची अंतिम इच्छा होती. २००५ साली आजोबांचे निधन झाले. दरम्यान त्यांच्या मुलाचेही निधन झाले आणि एक वर्षापूर्वी आजीचेही निधन झाले. आजोबांच्या इच्छेचा सन्मान राखण्यासाठी त्यांचा नातू ओमकार जोशी याने परिषदेत येऊन २५,५५१/- रु. देणगीचा धनादेश कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्याकडे सुपूर्द केला आणि या देणगीमागची कथाही सांगितली. तेव्हा ती देणगी स्वीकारताना पदाधिकारीही गहिवरले. ओमकार जोशी आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत.
ओमकार जोशी म्हणाले, ‘आजोबा लेखक होते. आमचे संपूर्ण कुटुंबच साहित्यावर प्रेम करणारे आहे. वाचनाची आवड जोपासणारे आहे. मी आयटी क्षेत्रात असलो तरी मराठी पुस्तकांच्या वाचनासाठी आवर्जून वेळ काढतो. साहित्य परिषदेविषयी आजोबांना कायमच जिव्हाळा वाटत होता. त्याच जिव्हाळ्यातून त्यांनी परिषदेला ही देणगी देण्याची इच्छा व्यक्त केली. मी त्यांच्या इच्छेचा सन्मान राखला.
प्रा. जोशी म्हणाले, ‘जोशी कुटुंबीयांसारख्या संवेदनशील साहित्यप्रेमी माणसांच्या बळावरच साहित्य संस्था टिकून आहेत. आजोबांच्या इच्छेचा सन्मान करण्यासाठी नातवाने पुढाकार घेऊन देणगी देण्याची ही घटनाच कौतुकास्पद आणि भावुक करणारी आहे. साहित्य संस्थांना अशात सरकारी अनुदान मिळते आहे त्यापूर्वी संस्था अशा साहित्यप्रेमी मंडळींच्या मदतीवर चालल्या आहेत. त्याची कृतज्ञ जाणीव साहित्य परिषदेला आहे.
