धर्मादाय वकील संघटनेच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार 

पुणे : पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशनची नूतन पदाधिका-यांची नुकतीच निवड झाली आहे. अध्यक्षपदी अ‍ॅड. शिवराज प्र. कदम जहागिरदार, उपाध्यक्ष अ‍ॅड. मोहन फडणीस, सचिवपदी अ‍ॅड. सुनिल मोरे व खजिनदारपदी अ‍ॅड. रजनी उकरंडे यांची नियुक्ती झाली आहे. रौप्यमहोत्सवी वर्षात पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशन पदार्पण करीत आहे.

नवनिर्वाचित पदाधिका-यांनी बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात माध्यान्ह आरती करून कार्यभार हाती घेतला. त्याप्रसंगी अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार यांनी संघटनेच्या सर्व वकील सभासदांचा आरोग्य विमा प्राधान्याने करण्याच्या आवश्यकतेवर भर देणार असल्याचे सांगितले. तसेच धमार्दाय कार्यालयांचे कामकाज जलद गतीने होण्यास आॅनलाईन कार्यप्रणाली सक्षम करण्यासाठी पाठपुरावा करणे व दूरस्थ पक्षकारांच्या व वकिलांच्या सोईसाठी व्हर्च्युअल हियरिंग त्वरीत कार्यरत होण्यास प्रयत्न करण्याचा मनोदय व्यक्त केला. रौप्यमहोत्सवी वर्षामध्ये विश्वस्त कायदा व त्यामध्ये कालसुसंगत सुधारणा होण्यासाठी कार्यकारिणीसह कार्यरत राहणार असल्याचे सांगितले.
नवनिर्वाचित अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार हे अनेक धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे विधी सल्लागार आहेत. तसेच ते शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत असलेल्या पुण्यातील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे भुतपूर्व अध्यक्ष व विद्यमान विश्वस्त आहेत. त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे ते सदस्य आहेत. पुणे बार असोसिएशन मध्येही त्यांनी सचिव व उपाध्यक्ष ही पदे भूषविली आहेत.
तर, उपाध्यक्ष अ‍ॅड. मोहन फडणीस हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र तर सचिव अ‍ॅड. सुनिल मोरे हे पाषाण परिसरातील मान्यवर वकील आहेत. खजिनदार अ‍ॅड. रजनी उकरंडे या लायन्स क्लबच्या सदस्या असून स्वत:च्या संस्थे मार्फत महिलांसाठी कार्य करतात. तसेच त्या कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या उत्सव उप प्रमुख आहेत.
सन १९९६ साली पुणे विभागीय सह धमार्दाय आयुक्त कार्यालयात पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशनची स्थापना करण्यात आली होती. राज्याचे माजी धमार्दाय आयुक्त कै. आनंदराव काळे हे संस्थापक अध्यक्ष होते. गेल्या पंचवीस वर्षात या संघटनेने विश्वस्त कायद्यात अनेक सुधारणा करणेकामी बहुमोल योगदान दिले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: