गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर सोलापुरात दगडफेक

सोलापूर : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक झाली आहे. सोलापुरातील श्री शैल्य हक्क महादेव मंदिर इथं ही घटना घडली आहे. या दगडफेकीत पडळकर यांच्या गाडीची काच फुटली आहे. मात्र, गाडीतील कुणीही जखमी झालेले नाही. 

या घटनेनंतर आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला माहिती आहे की या घटनेमागे नेमकं कोण असेल. गोरगरिबांची बाजू मांडत आहे. इथल्या प्रस्थापितांच्या विरोधात भूमिका मांडत आहे. ती आता या लोकांना आवडली नसेल. ते जे गप्पा मारत आहेत लोकशाहीच्या, फुले-शाहू-आंबेडकरांच्या, त्यांचं हेच उत्तर आहे का? वैचारिक लढाई तर विचाराने चाला. पण अशाप्रकारे उत्तर देणार असतील तर मी कधी गप्प बसणार नाही. आज दगडं फेकून मारले आहेत, उद्या गोळ्या घालतील. पण तरी मी माझी भूमिका मांडणं सोडणार नाही. घोंगडी बैठक उरकुन बाहेर आहे. त्या बैठकीला चारशे-पाचशे लोक होते. बैठक संपल्यानंतर मी गाडीत बसलो. गाडी सुरु करुन थोडं पुढे आल्यावर ही दगडफेक झाली. मी पाहिलं तेव्हा 4 ते 5 लोक होते. मात्र, अंधारात किती लोक असतील मला माहिती नाही, असं पडळकर यांनी सांगितलं.

आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने आघाडी सरकारवर टीका करीत असतात. आज त्यांनी शरद पवार यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला होता. “शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे” असं पडळकर म्हणाले. ते सोलापुरात बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी संदर्भात राज्य सरकारला डाटा सादर करण्यास सांगितले होते. मात्र, राज्य सरकारने ते केले नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं डीएनए बहुजन विरोधी आहे, म्हणूनच काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने विरोधी याचिका दाखल केली. काही जिल्ह्यासाठी मर्यादित असलेल्या नेत्यांना मी मोठे नेते मानत नाही. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे. असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: