पदोन्नती आरक्षणाबाबात बहुजन समाज पार्टी पुण्यातून आंदोलन करणार
पुणे : ऑक्टोबर 2020 मध्ये पदोन्नती तील आरक्षणासाठी महाराष्ट्रात मंत्री गट स्थापन केला, अलीकडे २२ मार्च २०२१ रोजी अपूर्ण प्रतिनिधित्वाबाबत अहवाल बनविण्यासाठी समिती नेमण्यात आली. समितीने एक महिन्यात अहवाल देण्याचे ठरवले होते परंतु काहीही झाले नाही. पदोन्नतीतील आरक्षणा बद्दल राजकीय इच्छाशक्तीचा पूर्ण अभाव आहे. महाविकास आघाडी सरकार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जाणीव व्हावी यासाठी बसपाच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन सुरू करणार आहोत याची सुरुवात पुणे जिल्ह्यातून करणार आहोत यांची माहिती बहुजन समाज पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुरज गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी सुदीप गायकवाड, भाऊ शिंदे, राहुल ओव्हाळ, हुलगेश चलवादी, सूरज गायकवाड आदी उपस्थित होते.
अनुसूचित जाती , जमाती , भटके विमुक्त व विशेष मागास प्रवर्गांसाठीचा महाराष्ट्रातील पदोन्नती मधील तेहतीस टक्के आरक्षणाचा मुद्दा गेली चार वर्षे रखडलेला आहे. २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालया कडून पदोन्नतीतील सर्व टप्प्यांवर आरक्षण देण्याचा महाराष्ट्राचा २५ मे २००४ चा शासन निर्णय रद्द झाला नि तेंव्हापासून पदोन्नती मधील आरक्षण थांबले आहे. ह्याचा फटका हज्जारो मागासवर्गीय कर्मचारी – अधिकाऱ्यांना बसला आहे. भारतीय संविधानात मुलभूत हक्काच्या कलम १६ ( ४ अ ) नुसार पदोन्नती मधील आरक्षणाची तरतूद असल्याने महाराष्ट्र सरकारने आरक्षण कायदा २००४ साली केला. हा कायदा कुठल्याही न्यायालयाने रद्द केलेला नसतांना पदोन्नती तील आरक्षण का रखडले ह्याचा उहापोह करणे आवश्यक आहे. ह्याबाबत अलीकडेच आलेल्या शासन निर्णयामुळे मागासवर्गीय समूहांत अस्वस्थता आहे. या सर्व विषयांच्या संदर्भात आम्ही आंदोलन करणार आहोत
– हुलगेश चलवादी, सचिव-महाराष्ट्र प्रदेश
