Thursday, September 3, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

नामकरण वाद – तर १६ ऑगस्टपासून विमानतळाचे काम बंद पाडणार, आंदोलकांचा सरकारला इशारा

नवी मुंबई : येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा पाटील यांचं नाव देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यासाठी आज सिडकोवर धडक देण्यात आली. १५ ऑगस्टपर्यंत या विमानतळाला दि.बा. पाटील यांचं नाव नाही मिळालं तर १६ ऑगस्टपासून विमानतळाचं काम बंद पाडू अशा इशारा आंदोलकांनी सरकारला दिला आहे. आंदोलन असल्याने सकाळपासूनच पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला होता. याशिवाय वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहनांचे मार्गदेखील बदलण्यात आले होते. यावेळी नवी मुंबईतील आंदोलकांच्या शिष्टमंडळानं सिडको भवनाकडे जात निवेदन दिलं.

दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर तसंच आंदोलनावर दि बा पाटील यांच्या कुटुंबीयांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. “बाळासाहेब ठाकरे किंवा दि बा पाटील यांचं नाव दिलं जावं हा संघर्ष आत्ता सुरु झाला आहे. दि बा पाटील यांचं नाव विमानतळाला देणं ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे. त्यांनी कित्येक वर्ष प्रकल्पग्रस्तांसाठी मेहनत घेतली, जे काम केलं ते सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना दि बा पाटील यांचं नाव दिलं जावं असं वाटत असून आमचीदेखील तीच इच्छा आणि आग्रह आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांच्या मुलाने दिली. पुढे ते म्हणाले की, “हा वाद आत्ता सुरु झाला आहे. दि बा पाटील यांच्या नावाला विरोध करणारे नेते कित्येक वर्षांपासून त्यांचं नाव द्यावं यासाठी आग्रही होते. त्यामुळे हा वाद राजकीय आहे”.

या मोर्चात मोठा जनसमुदाय उतरणार असण्याची शक्यता असल्याने बेलापूर परिसर सकाळी ८ पासून बंद ठेवण्यात आला होता. या परिसरात फक्त कार्यालयीन कामासाठी येणारे कर्मचारी, अधिकारी यांनाच प्रवेश देण्यात येत होता. तसंच अंतर्गत वाहतूकही बंद ठेवण्यात आली होती. या परिसरातून दररोज किमान १५ हजार लहान-मोठय़ा वाहनांची ये-जा होत असल्याने वाहतूक वळविण्यात आली होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading