राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटची वाढती रुग्ण गंभीर बाब – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई – राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच या व्हेरियंटचा समावेश Variant of Concern या श्रेणीमध्ये करण्यात आला आहे. देशात आतापर्यंत ४० रुग्णांमध्ये डेल्टा प्लसचा प्रकार आढळून आला आहे. यामध्ये २१ रुग्ण महाराष्ट्रातील आहेत, त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केंद्रानं महाराष्ट्रासह केरळ आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात डेल्टा प्लसचा सामना करण्यासाठी कोणत्या प्रकारची काळजी घेतली जात आहे, याविषयी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

राजेश टोपे यांनी राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे २१ रुग्ण असल्याची माहिती दिली. मात्र, त्याचवेळी हा इतक्या गंभीर पातळीवर वाढला नसल्याचं सांगितलं. “आपण प्रत्येक जिल्ह्यातून दर आठवड्याला काही नमुने प्रयोगशाळांना पाठवतो आहोत. आत्तापर्यंत ३४०० नमुन्यांपैकी २१ केसेसमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट सापडला आहे. त्याचं प्रमाण ०.००५ असं सापडलं आहे. त्यामुळे डेल्टा प्लस व्हेरिएंट अजून इतक्या गंभीर पातळीवर वाढलेला नाही. काळजीचा विषय नसला, तरी त्याचे गुणधर्म मात्र गंभीर आहेत. त्यासाठी या सर्व २१ केसेसचं विलगीकरण आपण करतो आहोत. त्यांचं निरीक्षण केलं जात आहे. त्यांच्या बाबतीत काँटॅक्ट ट्रेसिंग आणि टेस्टिंग सविस्तरपणे सुरू आहे”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

“डेल्टा प्लस व्हेरिएंट राज्यात जवळपास ७ जिल्ह्यांमध्ये सापडला आहे. महाराष्ट्रात त्याची एकूण रुग्णसंख्या २१ इतकी आहे. आता डेल्टा प्लस काळजीचं कारण झाला आहे. याचा अर्थ त्याचा फैलाव होण्याचा वेग, संसर्ग होण्याचं प्रमाण जास्त आहे. त्याचा धोका देखील जास्त असू शकतो. त्याशिवाय शरीरातल्या अँटिबॉडीजचा प्रभाव कमी करण्याचा गुणधर्म डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये पाहायला मिळतो आहे”, असं ते म्हणाले. तसेच, “डेल्टा प्लसचा अभ्यास सुरू आहे. सुदैवाने डेल्टा प्लसमुळे एकही मृत्यू झालेला नाही. केंद्राला ही माहिती पाठवण्याची कार्यवाही करत आहोत”, असं देखील राजेश टोपे यांनी सांगितलं.

Leave a Reply

%d bloggers like this: