नकारात्मक गोष्टी मुलांसमोर कमीत कमी यायला हव्यात – केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे

पुणे : मुलांवर कोरोनाचा मोठा परिणाम झाला आहे. मुले अतिशय संवेदनशील असतात. त्यामुळे कोणतीही गोष्ट ते पटकन विसरत नाहीत. कोरोनाविषयक नकारात्मक गोष्टी मुलांसमोर कमीत कमी येतील आणि मानसिकदृष्टया ते खचणार नाहीत यासाठी प्रयत्न करावेत. मुले दिवसभर घरी असतात त्यामुळे आई-वडिलांनी मुलांमध्ये मिसळायला हवे, असे प्रतिपादन केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केले.

श्री आनंद ग्रुपच्या वतीने कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनावर झालेला परिणाम या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रामध्ये संजय धोत्रे, बोलत होते. डिजिटल शिक्षणतज्ञ हर्षल विभांडिक, बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय मानकर, तसेच विद्यार्थी, पालक,शिक्षक सहभागी झाले होते.

चर्चासत्राचे संयोजन आनंद रेखी, डॉ. धर्मेंद्र शाह, डॉ. राजेश पवार, संकेत खरपुले, सौरभ लोखंडे, आशिष अभ्यंकर, महेश कुलकर्णी, नगरसेवक कुंदन गायकवाड, सागर हिंगने तसेच विजय चोरडिया, पारस यादव, मधुकर पाठक यांनी केले.

संजय धोत्रे म्हणाले, मुले ही देशाची संपत्ती आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचा सर्वप्रथम विचार करतो. कोरोना किती दिवस राहील माहीत नाही. परंतु त्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. कोरोनामुळे लोक घाबरले आहेत. विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. जगातल्या सगळ्यांवर कोरोनाचा परिणाम झाला आहे. यामध्ये मुलांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

डॉ. संजय मानकर म्हणाले, मुले दिवसभर घरी असतात त्यामुळे त्यांच्याकडून विविध कामे करुन घ्यावीत, अन्यथा ते स्क्रीन ऍडीक्ट  होतील. मुलांनी व्यायाम करायला हवेत. मानसिकदृष्टया मुले खचणार नाहीत, यासाठी देखील पालकांनी प्रयत्न करायला हवेत, असेही त्यांनी सांगितले.  प्रा. अंजू मल्होत्रा यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागत डॉ. राजेश पवार यांनी केले. सूत्रसंचालन महेश कुलकर्णी यांनी केले. आनंद रेखी यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. धर्मेंद्र शाह यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: