Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अलमट्टी धारणावर जलहवामान विषयक यंत्रणा बसवल्यास संभाव्य पुराचा धोका टाळणे शक्य

मुंबई :  महाराष्ट्राने रिअल टाईम डाटा ॲक्वीझिशन सिस्टीम (जलहवामान विषयक विनाविलंब माहिती मिळविण्याबाबतची यंत्रणा) बसवली आहे. मात्र कर्नाटक सरकारने ही यंत्रणा अजून बसवलेली नाही. कर्नाटकात ही यंत्रणा तयार झाली तर एकत्रित अलमट्टीची डायनॉमिकली लेवल कंट्रोल करणं शक्य होईल. तसेच संभाव्य पुरपरिस्थिती टाळता येईल, असा सल्ला जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पांची यांना दिला.

यंदाच्या पावसाळ्यात पश्चिम महाराष्ट्रातील संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी तसेच कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या पाण्याविषयी दोन्ही राज्यात योग्य समन्वय असावा याकरिता जयंत पाटील यांनी आज बी. एस. येडियुरप्पा यांची बंगलूर येथे भेट घेऊन चर्चा केली. यावेळी कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई तसेच कर्नाटक राज्याचे मुख्य सचिव, तसेच जलसंपदा विभागाचे विशेष कार्य अधिकारी विजय कुमार गौतम आदी उपस्थित होते. या बैठकीत कृष्णा व भीमा नद्यासंदर्भात येणाऱ्या काळात पूराचे नियंत्रण कशापद्धतीने करता येईल, याची चर्चा झाली. त्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पाटील म्हणाले, जलहवामान विषयक विनाविलंब माहिती मिळविण्याबाबतची यंत्रणा महाराष्ट्रात आपण बसवली आहे. मात्र कर्नाटक सरकारने ही यंत्रणा अजून बसवलेली नाही. कर्नाटकात ही यंत्रणा तयार झाली तर एकत्रित अलमट्टीची डायनॉमिकली लेवल कंट्रोल करणं शक्य होईल. एकंदर येणारा अलमट्टी धरणातील येवा आणि पुढे जाणारा येवा व महाराष्ट्रात पडणारा पाऊस या सगळ्यावर आपण प्रभावीपणे जर नियंत्रण ठेवले तर कुठून किती पाणी सोडायचं आणि कोणत्या धरणात किती पातळी ठेवायची खास करुन अलमट्टी धरणाच्या पाण्यावर चांगलं नियंत्रण ठेवता येईल, अशीही चर्चा या बैठकीत झाली. ही बैठक दोन्ही राज्यात योग्य समन्वय साधण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading