Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री सकारात्मक; रामदास आठवलेंचा विश्वास


मुंबई प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची भूमिका घेतली असताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री मराठा समाजाच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न करत असून त्यांनी समाजाला न्याय देण्याची भूमिका कायम ठेवली आहे, असे आठवले यांनी स्पष्ट केले.
पावसाळ्यापूर्वी मिठी नदीच्या पाहणीदरम्यान पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले की, मनोज जरांगे हे आपले चांगले मित्र आहेत. मात्र त्यांनी कोणती भूमिका घ्यावी यावर भाष्य करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजासाठी सकारात्मक निर्णय घेतले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मराठा समाजाला देण्यात आलेल्या १० टक्के ईडब्ल्यूएस आरक्षणाचा प्रत्यक्ष लाभ अनेकांना मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या आरक्षणाचा फायदा समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचावा, अशी आमची मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.
याशिवाय रिपब्लिकन पक्षाला राज्यातील दोन ते तीन महामंडळांची अध्यक्षपदे मिळावीत, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे आठवले म्हणाले. विधान परिषदेची जागा अपेक्षित असूनही मिळाली नसल्याने पक्षावर अन्याय होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
मिठी नदीच्या पाहणीबाबत बोलताना दरवर्षी पावसाळ्यात नदी तुंबून नागरिकांच्या घरात पाणी शिरते व मोठे नुकसान होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ७ जूनपर्यंत गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading