मराठा आरक्षण – समन्वयकांशी चर्चा करुन पुढील दिशा ठरवणार- संभाजीराजे छत्रपती
मुंबई – मराठा समाजाच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, तसेच सरकारने सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मराठा मूक आंदोलनाचे नेते खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य शासनाने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या असल्या तरी मूक आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगितले आहे.
मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाला सुरुवात केलेली असताना राज्य सरकारने याची दखल घेऊन खासदार संभाजीराजे बोसले यांच्याशी गुरूवारी सविस्तर चर्चा केली. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण आदींच्या उपस्थितीत संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांशी त्यांच्या प्रमुख मागण्यांबाबत चर्चा केली.
नाशिकला सर्व समन्वयकांशी चर्चा करुन पुढील दिशा ठरवली जाणार आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. यासह ते असेही म्हणाले की, कोल्हापूरमध्ये सुरु झालेलं मूक आंदोलन सुरुच राहणार आहे. हे आंदोलन ३६ जिल्ह्यांमध्ये घेऊन जाण्याचा आमचा निर्धार आहे. राज्य सरकारशी झालेल्या चर्चेत त्यांनी आंदोलन थांबवण्याबाबत विनंती केली. मात्र, आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. सरकारशी चर्चा सुरु आहे. दरम्यान नाशिकला येत्या २१ जूनला सकल मराठा समाजाच्यावतीनं मूक आंदोलन करण्यात येणार आहे.
मराठा समाजाने राज्य सरकारकडे केलेल्या मागण्या आणि त्यावर राज्य सरकारने दिलेले आश्वासनाचा पाठपुरावा घेण्यासाठी एका समन्वय समितीची स्थापना करण्यास राज्य सरकारने सांगितले आहे. त्यानुसार एका समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचे संभाजीराजे भोसले यांनी सांगितले.
