जिल्ह्याबाहेर आणि राज्याबाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा त्यांच्या मुळ जिल्ह्यात नव्‍याने प्रवेश घ्यावा लागणार

पुणे –कोरोनामुळे राज्यातील ३३ हजार ३७० शालेय मुलांनी तालुका, जिल्हा किंवा राज्याबाहेर स्थलांतर करत आपापले मूळ गाव गाठले आहे. या मुलांना आता त्यांच्या मूळ शाळेपासून मुकावे लागणार आहे. शिवाय मूळ गावातील शाळेत पुन्हा प्रवेश घ्यावा लागणार आहे. यामध्ये पुणे शहर व जिल्ह्यातील १ हजार ११५ मुलांचा समावेश आहे. दरम्यान, राज्यातील विविध जिल्ह्यांमधील ३ हजार ३२९ मुले पुणे जिल्ह्यात स्थलांतरित झाली आहेत.

शिक्षण विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून हे उघड झाले आहे. राज्यभरातून स्थलांतरित झालेल्या एकूण मुलांपैकी ७ हजार ३१४ मुले तालुक्याबाहेर ११ हजार ९७२ मुले ही जिल्ह्याबाहेर, १४ हजार ८४ मुले ही महाराष्ट्राच्या बाहेर गेली आहेत. पुणे जिल्ह्यातील एकूण स्थलांतरित मुलांपैकी १६२ मुले ही शाळेत प्रवेश असलेल्या गावाच्या किंवा तालुक्याच्या बाहेर गेली आहेत. त्यामुळे या मुलांचे स्थलांतर झाले असले तरी पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यात स्थिरावली आहेत. त्यामुळे या मुलांना पुन्हा पुणे जिल्ह्यातील शाळांमध्येच शिक्षण घेता येणार आहे. त्यासाठी त्यांना केवळ नव्या शाळेत पुन्हा प्रवेश घ्यावा लागणार आहे. पुणे जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यांमध्ये स्थलांतरित झालेल्या मुलांची संख्या ७२४ तर, पुणे जिल्ह्यातून महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित झालेल्या मुलांची संख्या २२९ आहे. जिल्ह्याबाहेर आणि राज्याबाहेर गेलेल्या बालकांना पुन्हा त्यांच्या मुळ जिल्ह्यात किंवा राज्यातील शाळांमध्ये नव्‍याने प्रवेश घ्यावा लागणार आहे.

जिल्ह्यातून अन्यत्र स्थलांतरित झालेल्या मुलांमध्ये केवळ एका विशेष गरजाधिष्ठित मुलाचा समावेश आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातून आणि राज्याबाहेरून पुणे जिल्ह्यात स्थलांतरित झालेल्या मुलांमध्ये अन्य तालुक्यांतून आलेली ८७४, अन्य जिल्ह्यांमधून स्थलांतरित झालेली २ हजार १८२ आणि अन्य राज्यांमधून आलेल्या २७३ मुलांचा समावेश आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून कोरोनामुळे पुणे जिल्ह्यात स्थलांतरित झालेली प्रवेशपात्र मुले शालेय शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, याची खबरदारी पुणे जिल्हा परिषद घेणार आहे. यासाठी सर्व प्रवेशपात्र मुलांना जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये प्रवेश देण्याचे नियोजन केले आहे. या मुलांना त्यांच्या वयानुसार त्या त्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे.

-रणजित शिवतरे, उपाध्यक्ष व शिक्षण सभापती, जिल्हा परिषद, पुणे.

Leave a Reply

%d bloggers like this: