गॅस सिलेंडर देणाऱ्या ३४ सेवादूतांचा मातृशक्तीच्या हस्ते सन्मान

पुणे : गृहिणींच्या स्वयंपाकघराच्या कामातील महत्त्वाचा दुवा असलेल्या सिलेंडर डिलिव्हरी देणा-या कामगारांचा सन्मान मातृशक्तीच्या हस्ते करण्यात आला. अन्न-वस्त्र-निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत. गृहिणींना स्वयंपाकघरात सिलेंडर म्हणजे अत्यावश्यक घटक. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता वेळेवर घरोघरी सिलेंडर पोहोचविणा-या सेवादूतांचा सन्मानपत्र व किराणा किट देऊन सन्मान करण्यात आला. 

पंचकन्या, ध्वज फाऊंडेशन आणि शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी यांच्या वतीने शिवाजीनगर कोर्टाजवळील पासलकर गॅस एजन्सीमधील ३४ सेवादूतांना सन्मानित करण्यात आले. यावेळी पासलकर गॅस एजन्सीचे पंढरीनाथ पासलकर, पंचकन्या संस्थेच्या अ‍ॅड.प्रार्थना सदावर्ते, प्रा.संगीता मावळे, वैशाली लोढा, अ‍ॅड. राणी कांबळे, ज्योती काचोळे, ध्वज फाऊंडेशनचे अ‍ॅड.शिरीष थिटे, प्रणव आमडेकर, आकाश मोकाशी, प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, अरुणकुमार बाभुळगांवकर, सुरेश तरलगट्टी उपस्थित होते. 

अ‍ॅड.प्रार्थना सदावर्ते म्हणाल्या, कोविड महामारीच्या काळात कोणतीही तक्रार न करता, घरी सिलेंडर पोहोचविणा-या या सेवादूतांचे कार्य मोठे आहे. कुटुंबातील सर्व सदस्य घरातच असल्याने गॅस सिलेंडरची आवश्यकता नेहमी असे. त्यात स्वत:चा जीव धोक्यात घालून सिलेंडर डिलिव्हरी देणा-यांनी आपले काम केले. त्यामुळे आम्ही गृहिणी यांचा सन्मान करीत आहोत. 
शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, ख-या अर्थाने गरज असताना या घटकाने काम केले आहे. घरपोच गॅस सिलेंडर मिळत असल्याने गृहिणींना फारशी अडचण आली नाही. त्यामुळे आरोग्याशी निगडीत सेवा देणा-यांप्रमाणे हे देखील कोरोना काळातील महत्त्वाचे सेवादूत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: