स्वा. सावरकरांचे स्थानबद्धतेतील समाज सुधारणेचे काम समोर यावे – चंद्रकांत पाटील

पुणे – स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होतं. ते संपूर्ण समाजासाठी एक आदर्श पुरुष होते. आपल्या स्थानबद्धतेच्याकाळात त्यांनी जातीनिर्मुलनाचे मोठे आणि अतिशय महत्त्वाचे काम केले, त्यांचे हे कार्य नव्या पिढीसमोर आले पाहिजे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) पुणे केंद्र च्या वतीने निबंध स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेतील विजेत्यांना चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच सावरकर प्रेमी विद्याधरजी नारगोलकर यांना सावरकर प्रेमी पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाला पत्रकार संभाजी पाटील, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, ग्राहक पेठेचे सुर्यकांत पाठक, कुंदन साठे, संस्थेचे अध्यक्ष अॅड. गणेश गोखले, केंद्र प्रमुख मकरंद माणकीकर, सांस्कृतिक प्रमुख विश्वनाथ भालेराव, निता पारखी, सुजाता मवाळ, सुरेश परांजपे, उल्हास पाठक, मदन सिन्नरकर, सुवर्णा रिसबुड, श्रीकांत जोशी, अनघा जोशी शैला गिजरे, अपर्णा मोडक आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होतं. ते केवळ क्रांतिकारक होते इतकाच त्यांचा परिचय नाही. तर ते प्रखर हिंदुत्ववादी होते, सामाजिक सुधारकही होते, भाषाशुद्धीसाठीचे आग्रही होते, विज्ञानवादी होते, अशाप्रकारे संपूर्ण समाजासाठी एक आदर्श पुरुष होते, त्यांना ब्रिटीशांनी आंदमानमधून मुक्त करताना रत्नागिरी जिल्ह्यात स्थानबद्ध केले होते. या स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी जातीनिर्मुलनाचे महत्त्वाचे काम केले. त्यांचे हे कार्य नव्या पिढीसमोर आले पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, अभाविपचं काम करत असताना, १९८२ साली स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे शतक महोत्सवी वर्ष होते. त्यावेळी अभाविपने रत्नागिरीतील पतीत पावन मंदिर ते चैत्यभूमी अशी समता ज्योत परिषदेच्या वतीने आयोजित केली होती. याचा प्रमुख मी असल्याने स्वातंत्र्यवीरांच्या जीवनातील अनेक पैलू जवळून वाचनात आले. हे वाचताना स्वातंत्र्यवीर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होतं असं नेहमी जाणवत होतं.

Leave a Reply

%d bloggers like this: