लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरावर उभारली १५ फुटी स्वराज्यगुढी

पुणे – शिवरायांचा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, वाघनखे, शिवमुद्रा या पंचशुभ चिन्हांनी अलंकृत भगव्या स्वराज्यध्वजासह १५ फुटी शिवशक राजदंड स्वराज्यगुढी लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरावर उभारण्यात आली. ग्रामविकास मंत्रालय, उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय यांनी शासकीय परिपत्रक काढून त्यासंबंधित कार्यालयांना स्वराज्यगुुढी उभारुन उत्सव करण्यास सांगितले असले, तरी देखील स्वयंस्फूर्तीने दत्तमंदिर ट्रस्टने मंदिराच्या प्रवेशद्वारात स्वराज्यगुढी उभारुन पूजन करण्यात आले.


बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे शिवराज्याभिषेक तथा शिवस्वराज्य दिन स्वराज्यगुढी उभारुन साजरा करण्यात आला. यावेळी शाहीर हेमंतराजे मावळे, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल रुकारी, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, उत्सव उपप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, विश्वस्त युवराज गाडवे, अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, महेंद्र पिसाळ आदी उपस्थित होते.

शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, शिवराज्याभिषेक दिन म्हणजेच ६ जून १६७४ हा दिवस भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा अतिशय महत्वाचा दिवस आहे. आपण ३४८वा शिवराज्याभिषेक दिन साजरा करीत आहोत. शिवरायांनी जसा रयतेसाठी राज्यकारभार केला, त्याचा आदर्श प्रत्येकाने घ्यायला हवा. स्वयंस्फूर्तीने मंदिरावर स्वराज्यगुढी उभारुन दत्तमंदिर ट्रस्टने घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे. सर्व संस्था, गणेशोत्सव मंडळे व सार्वजनिक ठिकाणी स्वराज्यगुढी उभारुन या उपक्रमाचे अनुकरण करायला हवे.

Leave a Reply

%d bloggers like this: