कोरोनामुक्त गावाचा संकल्प करावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
मुंबई, दिनांक ३० : दुसऱ्या लाटेचा आपण चांगला मुकाबला केला असला तरी कोविडचे आव्हान कायम आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी आपण कोविडमुक्त गावाचा संकल्प करून देशासाठी एक उत्तम उदहारण घालून द्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला समाजमाध्यमाद्वारे थेट संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते त्यांनी चांगली कामगिरी करून कोविडमुक्त गाव करणाऱ्या सरंपंचाचे कौतुकही केले.
आपण राज्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी, मी जबाबदार, असे वेगवेगळे अभियान यशस्वीरित्या राबवले आता शहर आणि गावांनी ठरवले तर आपण कोरोना मुक्त गाव आणि कोरोनामुक्त शहराची संकल्पना यशस्वीरित्या राबवू शकू. प्रत्येक घर, प्रत्येक गाव, प्रत्येक शहर कोरोनामुक्त झाले तर राज्य कोरोनामुक्त होईल असे सांगतांना त्यांनी गाव कोरोनामुक्त केलेल्या पोपटराव पवार, ऋतूराज देशमुख आणि कोमलताई करपे या तीन सरपंचाच्या कामाचा गौरव केला. राज्यात दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या ही ६७ हजारांहून २४ हजारांएवढी कमी झाली असली तरी ती आजही पहिल्या लाटेतील उच्चांकी रुग्णसंख्येएवढी असल्याचे सांगतांना सावधगिरीने पुढे जावे लागत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढील १५ दिवस राज्यात लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे सांगतांना जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन नियम शिथिल करणार असल्याचेही म्हटले.
मदतीच्या निकषात सुधारणा करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार
कोरोनाच्या संकटाबरोबर राज्याने चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तींचाही सामाना केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
त्यांनी निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना केलेल्या वाढीव मदतीप्रमाणे तोक्ते चक्रीवादळग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे सांगतांना एनडीआरएफ आणि एसडीआरएफ अंतर्गत करावयाच्या मदतीच्या निकषात सुधारणा करण्याच्या पंतप्रधानांकडे केलेल्या मागणीचा पुनरुच्चार केला.
कायमस्वरूपी उपाययोजना
दरवर्षी येणाऱ्या वादळाची शक्यता लक्षात घेऊन सागरतटीय भागात कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर शासन लक्ष केंद्रीत करत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. यामध्ये धुप प्रतिबंधक उपाययोजना, भूमीगत वीज वाहक तारा, भूकंपविरोधक घरांचे बांधकाम याबाबींचा समावेश असल्याचे ते म्हणाले
दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत
दहावीच्या परीक्षा यावर्षी न घेता मुल्यांकनाच्या आधारे विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगतांना त्यांनी बारावीच्या परीक्षांबाबतचा निर्णयही शासन लवकरच घेणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की ज्या परीक्षांचे महत्त्व (नीट, सेट, जेईई) विद्यार्थ्यांच्या पुढील भवितव्यासाठी अधिक आहे त्या परीक्षांचे निर्णय घेतांना केंद्र सरकारने देशभरासाठी एकच शैक्षणिक धोरण निश्चित करणे आवश्यक आहे. ही मागणी आपण पंतप्रधान आणि केंद्र सरकारकडे करणार असल्याचेही ते म्हणाले.
कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी केंद्र सरकारने आज एक योजना जाहीर केल्याची माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले की राज्य ही अशा बालकांसाठी योजना तयार करत असून त्यांचे पूर्ण पालकत्व राज्य सरकार स्वीकारणार आहे. आयुष्याची वाटचाल करतांना ही बालके पोरकी होणार नाही, त्यांच्या प्रत्येक पावलागणिक शासन त्यांच्यासोबत राहील असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
काही जिल्ह्यात, ग्रामीण भागातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले की, तिसरी लाट तारीख सांगून येणार नाही. ते आपल्या वागणुकीवर आणि नियमांच्या पालनावर अवलंबून आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत आताचा कोरोना व्हायरस संसर्ग अधिक वेगाने करतो, झपाट्याने पसरतो आणि रुग्ण बरे होण्यास वेळ लागत आहे. या विषाणुने दीर्घ काळासाठी ऑक्सीजनची आवश्यकता वाढवली आहे. आपल्याला १८०० मे.टनच्या आसपास ऑक्सीजनची गरज होती. आपली क्षमता १२५० मे.टन होती अशा कठीण परिस्थितीत इतर ठिकाणांहून ऑक्सीजन आणून त्याचे सुयोग्य व्यवस्थापन करण्याचे कठीण काम प्रशासकीय यंत्रणेने केले असल्याचे कौतूकोदगार ही मुख्यमंत्र्यांनी काढले.
म्युकरकायकोसीसचे ३ हजार रुग्ण राज्यात असून टास्कफोर्समधील तज्ज्ञ डॉक्टर, डॉक्टर भुमकर यावर उपाययोजना आणि उपचार सुचवित असल्याचे ते म्हणाले. माझा डॉक्टरांशी आपण सातत्याने संवाद साधत असल्याचे सांगतांना आता पावसाळ्याच्या तोंडावर कोविड, नॉनकोविड रुग्ण ओळखून त्यांना योग्य उपचार देण्यामध्ये डॉक्टरांची भूमिका खुप महत्वाची असल्याचे व कोविड रुग्णांना विशेषत: गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना योग्य वेळी योग्य उपचार देण्याचे योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी या डॉक्टरांनी घ्यावी असेही ते म्हणाले.
उपलब्धतेप्रमाणे लस
तिसऱ्या लाटेमध्ये बालकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने त्यासाठीचे नियोजन शासनाने आधीच सुरु केल्याचे सांगतांना त्यांनी बालकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्कफोर्सची माहिती दिली. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्यास शासन समर्थ असून एक रक्कम देऊन ही लस खरेदीची राज्याची तयारी असली तरी लसीची मर्यादित उपलब्धता लक्षात घेता जस जसी लस येईल तस तशी सर्वांना लस उपलब्ध करून दिली जाईल असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. त्यांनी आतापर्यंत २.२५ कोटी नागरिकांना लस दिल्याची माहिती दिली.
Share this:
- Share on X (Opens in new window) X
- Share on Facebook (Opens in new window) Facebook
- Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Share on Telegram (Opens in new window) Telegram
- Share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Share on Pinterest (Opens in new window) Pinterest
- Email a link to a friend (Opens in new window) Email
- Print (Opens in new window) Print
