सांगली जिल्ह्यात 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन – पालकमंत्री जयंत पाटील
सांगली दि. 9 – राज्यात ‘ब्रेक द चेन’ निर्बंधांची अंमलबजावणी 15 मे 2021 पर्यंत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून जिल्ह्यातही 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन पाळण्यात येईल. त्यानंतर राज्य शासनाच्या भूमिकेनुसार जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींचे मत लक्षात घेऊन जिल्ह्यासंदर्भात पुढील निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-19 सद्यस्थितीचा आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम (व्हीसीद्वारे), खासदार संजय पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार सदाभाऊ खोत (व्हीसीद्वारे), आमदार अरूण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार अनिल बाबर, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रम सावंत, महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस आदी उपस्थित होते.
जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील वाढती रूग्णसंख्या, बेडची उपलब्धता, व्हेंटिलेटरची उपलब्धतता, लसीकरण, लॉकडाऊन अंमलबजावणी आदी सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेतला. आणखी व्हेंटीलेटर्स वाढविण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींनी एकमुखाने मागणी केली. यावर बोलताना पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्हेंटीलेटर बेड उपलब्धतेबाबत कॉल सेंटरला त्वरीत माहिती उपलब्ध झाली पाहिजे व रूग्णाला व्हेंटीलेटर बेड उपलब्ध झाला पाहिजे यासाठी यंत्रणांमध्ये अत्यंत काटेकोर समन्वय असणे आवश्यक आहे. जिल्ह्याला दोन दिवसांमध्ये अधिकचे 30 व्हेंटीलेटर्स उपलब्ध होणार असून राज्य शासनाकडे आणखी 20 ते 25 व्हेंटीलेटर्सची मागणी करण्यात आली आहे.
लसीकरणाचा आढावा घेत असताना पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यात आत्तापर्यंत 5 लाख 98 हजार 386 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये पहिला डोस 5 लाख 17 हजार 92 तर दुसरा डोस 80 हजार 794 जणांचा झाला आहे. ज्यांचा पहिला डोस झाला आहे अशांना विहीत मुदतीत दुसरा डोस द्यावा. त्यासाठी आवश्यक असणारे लसीकरणाचे डोस मिळविण्यासाठी कटाक्षाने प्रयत्न करू, असे सांगितले.
लॉकडाऊनच्या निर्बंधांची अंमलबजावणी काटेकोरपणे होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सध्या जिल्ह्यात प्रतिदिन 6 हजाराहून अधिक कोरोना चाचण्या होत असून यामधील साधारणत: 30 टक्के नागरिक पॉझिटीव्ह येत आहेत. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्याच्या भूमिकेनुसार 15 मे पर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन पाळण्यात येईल.
जिल्ह्याला सद्या प्रतिदिन 44 मेट्रिक टन ऑक्सिजन मंजूर झाला असून सदरचा ऑक्सिजन जेमतेम पुरविण्यात येत आहे. ऑक्सिजन पुरवठा व रेमडेसिवीर पुरवठा या दोन बाबींचे फार मोठे आव्हान असून राज्यांना रूग्णसंख्येच्या प्रमाणात रेमडेसिवीरचा पुरवठा व्हावा अशी मागणी केंद्राकडे करण्यात आल्याचेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
