कोरोना – रविवारी राज्यात 60 हजार 226 रुग्ण बरे तर 572 जणांचा मृत्यू
मुंबई – महाराष्ट्रात कोरोना प्रसाराचा वेग कमी झाल्यानं काहीसा दिलासा आहे. रविवारी राज्यात एकूण 48 हजार 401 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर त्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांचा आकडा हा 60 हजार 226 एवढा आहे. राज्यात आजपर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 44 लाख 7 हजार 818 एवढी आहे. त्यामुळं बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण म्हणजे राज्याचा 86.4 एवढा झाला आहे. राज्यात रविवारी मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा 572 आहे. तर राज्यातील सध्याचा मृत्यूदर 1.49% एवढा आहे. राज्यात सध्या 6 लाख 15 हजार 783 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी 26 हजार 939 संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
मुंबईच्या अनेक भागांमध्ये रुग्णसंख्या झपाट्यानं कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. धारावीमध्ये तर अवघे 16 आणि दादरमध्ये केवळ 16 रुग्ण आढळून आले. तर माहीममध्ये 34 रुग्ण आढळून आले. त्यामुळं रुग्णसंख्या कमी होत असल्यानं प्रशासनालाही काहीसा दिलासा मिळाला आहे.
रविवारी पुण्यात 2025 नवे रुग्ण आढळले. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दुपटीहून अधिक म्हणजे 4825 एवढे आहे. रविवारी पुणे शहरातील 54 तर पुण्यात उपचार घेणाऱ्या बाहेरच्या 24 रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. सध्या अॅक्टिव्ह असलेल्या रुग्णांचा आकडा 33732 एवढा आहे.
