Thursday, September 3, 2026
PUNE

न्या. रानडे यांच्या उदारमतवादाची देशाला गरज: प्रा मिलिंद जोशी

पुणे: विवेक बुध्दीची प्रतारणा , अभिनिवेश, नैतिक प्रेरणेपेक्षा पक्ष, संघटना आणि नेतृत्वाचा दबाव आणि टोकाची भूमिका यामुळे समाजाचे अध: पतन आणि लोकशाहीचे  नुकसान होते असे न्या रानडे यांचे सांगणे होते. ते टोकाची भूमिका टाळणारे नेमस्त सुधारणावादी आणि उदारमतवादी तत्वज्ञ होते. सद्यस्थितीत देशाला न्या रानडे यांच्या उदारमतवादाची गरज आहे असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.

वसंत व्याख्यानमालेत’ न्या रानडे: उदारमतवादी तत्वज्ञ’  या विषयावर  व्याख्यान गुंफताना ते बोलत होते प्रा जोशी म्हणाले, महात्मा गांधींनी ज्यांना राजकीय गुरू मानले ते नामदार गोखले न्या रानडेना गुरुस्थानी मानत होते. महात्मा गांधींनी धरलेला साधन शुचितेचा आग्रह आणि नामदार गोखले यांचा राजकारणाच्या आध्यात्मीकरणाचा विचार हा न्या रानडे यांच्या विचारांचा पुनरुच्चार होता. रानडे, गोखले आणि गांधी हे तत्वनिष्ठेचे घराणे होते. क्रांतीने सुधारणा होते पण त्यात मोडतोड आणि पडझड खूप होते. कायद्याने ती घडवून आणता येते. विवेक आणि परंपरा यांचा आश्रय घेऊनही ती करता येते. जीवनाची सर्व अंगांनी सुधारणा घडावी यासाठी धर्मकारण, अर्थकारण, राजकारण आणि समाजकारण यांची परस्पर पूरकता विचारात घेतली पाहिजे. कायद्याचे राज्य अस्तित्वात येण्यासाठी सामाजिक सद्सद विवेकबुद्धी जागृत होणे गरजेचे आहे असे रानडे यांना वाटत होते.

राजकिय स्वातंत्र्य प्राप्त होऊनही सामाजिक स्वातंत्र्य मिळत नसेल तर देशाची दुरवस्था होते याकडे न्या रानडे यांनी लक्ष वेधले होते. राजाराम मोहन रॉय यांनी प्रसृत केलेल्या सामाजिक सुधारणांचा त्यांनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून पुरस्कार केला.एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लोकहितवादींच्या सहकार्याने ग्रंथकार संमेलनाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या न्या रानडे यांनी  प्रार्थना समाज, सार्वजनिक सभा, डेक्कन सभा, वक्तृत्व उत्तेजक सभा , वेदशास्त्र उत्तेजक सभा, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था, पुणे नगर वाचन मंदिर, वसंत व्याख्यानमाला, हेमंत व्याख्यानमाला, राष्ट्रीय सभा, सामाजिक परिषद या संस्थांसाठी योगदान दिले. कार्यकर्त्यांचे मोहोळ ही ओळख महाराष्ट्राला न्या रानडे यांनी केलेल्या संस्थात्मक कार्यामुळे मिळाली.  रानडे हे सर्वांगीण आणि सर्वसमावेशक सुधारणेचे  प्रणेते होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading