मराठी बालरंगभूमीचा इतिहास लिहिण्यासाठी संशोधन कार्य हाती घ्यावे; परिसंवादातील सूर

पुणे : मराठी बालरंगभूमीचा इतिहास लिहिला जावा यासाठी परिषदेने संशोधन कार्य हाती घ्यावे, तालुकास्तरावर बालमंच उभारला जावा, बालनाट्य चळवळीत शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक यांचा सहभाग वाढण्यासाठी प्रयत्न व्हावेत, परिषदेच्या शाखांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आदान-प्रदान व्हावे, अशी अपेक्षा बालरंगभूमी परिषदेने आयोजित केलेल्या परिसंवादात व्यक्त केली.

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती शाखेतर्फे ‘बालरंगभूमी…आमची भूमिका आमची अपेक्षा’ या विषयावर ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यात राज्यातील अनेक जिल्हा शाखांच्या प्रतिनिधींनी उत्साहाने भाग घेऊन बालरंगभूमीला भरभराटीचे दिवस यावेत यासाठी मोलाच्या सूचना केल्या.

बाल रंगभूमी परिषदेचे अध्यक्ष प्रकाश पारखी यांनी प्रास्ताविकाद्वारे परिसंवादाची सुरुवात केली. उपाध्यक्ष राजू तुलालवार यांनी बालरंगभूमीची परिषदेने मान्य केलेली व्याख्या सांगताना, बालनाट्यासोबत बालसंगीत, बालनृत्य, जादू, बाहुल्यांचे खेळ, शॅडो प्लेसारखे विविधांगी खेळ हे बालरंगभूमीचा भाग असल्याचे सांगितले. बालरंगभूमीचे फायदे अधिकाधिक बालकलाकार आणि बालप्रेक्षक यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी परिषदेच्या जिल्हा शाखांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

मराठी बाल रंगभूमीचा इतिहास लिहिला जावा, असे सांगून त्यासाठी परिषदेने संशोधनास चालना देण्याचे आवाहन संजय पाटील (बीड) यांनी केले. बाल नाट्याची दिशा वयोगटाप्रमाणे ठरवून, तालुका स्तरावर बालनाट्य टिकविण्याचे कार्यक्रम होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
त्र्यंबक वडस्कर (परभणी) म्हणाले, परभणी शाखेतर्फे मुलांचा सहभाग असणारीच नाटके बसवतो. मुलांचा सहभाग असेल असेच कार्यक्रम सादर करतो. सध्या नाट्यगृह उपलब्ध नसताना मुलांच्या 5 मिनिटांच्या नाटुकल्या मोबाईलवर रेकॉर्ड वरून प्रसारित करण्यात याव्यात, अशी सूचना त्यांनी केली. परभणीचे नागेश कुलकर्णी यांनी तालुका स्तरावर बाल मंच उभारून अधिकाधिक मुलांपर्यंत पोहचण्याची गरज व्यक्त केली.

प्रबोध कुलकर्णी (ठाणे) यांनी विविध स्पर्धांद्वारे मुलांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील शाळेच्या शिक्षक व मुख्याध्यापकांना या चळवळीत सामील करून घ्यावे, असा विचार मांडला. परिषदेच्या शाखांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची देवाण-घेवाण झाल्यास मुलांना अधिक वेगवेगळे मंच उपलब्ध होतील असे सूचित केले.
प्रसाद भणगे (नगर) यांनी नगर जिल्हा शाखेने घेतलेल्या विविध स्पर्धा, शिबिरांची माहिती दिली. जिल्ह्यात ग्रीप्स थिएटरची संकल्पना राबविण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. विविध बाल महोत्सव आणि संमेलन यांद्वारे तालुका स्तरावरील मुलांना बालनाट्य चळवळीत सामावून घेतले जावे, असे आवाहन नगर शाखेच्या उर्मिला लोटके यांनी केले.
संजय रहाटे (नागपूर) यांनी सध्याच्या परिस्थितीत ऑनलाईन कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात. त्यांना मुलांचा चांगला प्रतिसाद मिळतो, असे आवर्जून सांगितले. संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी मुलांनी केलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. नागपूर शाखेने बालनाट्य चळवळीत शाळा, शिक्षक, मुले सर्वांना सहभागी करून घेतले आहे असे विशेषत्वाने सांगितले.
लागू सर (पुणे) यांनी बालरंगभूमीचा इतिहास लिहिला जावा यासाठी परिषदेने संशोधन कार्य हाती घ्यावे अशी सूचना केली. बालनाट्य अभिवाचनाच्या कार्यक्रमांची गरजही त्यांनी व्यक्त केली. ज्या शाखांनी उत्तम कामगिरी केली असेल त्या शाखांच्या कार्यपद्धतीचे दर्शन सर्वांना ऑनलाईन उपलब्ध करून द्यावे,असे सांगितले.
मुख्य शाखा सर्वांना अपेक्षित मदत करेल असे आश्वासन कार्यवाह सतिश लोटके यांनी दिले.
परिसंवादात डॉ.दीपा क्षीरसागर (बीड), विनोद ढगे (जळगाव), रवी कुलकर्णी (औरंगाबाद), सुजय भालेराव (धुळे), मंदार टिल्लू (ठाणे) सहभागी झाले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: