ध्वज हे वैराग्य आणि पुरुषार्थाचे प्रतिक – डॉ.रामचंद्र देखणे

पुणे : भगवी पताका हे राष्ट्र, धर्म, परमार्थ आणि पुरुषार्थाचे प्रतिक आहे. भगवा ध्वज ही देवालयाची निशाणी आहे. देवालयावर द्विकेतू ध्वज फडकविला जातो, ते आपल्या संस्कृतीचे प्रतिक आहे.  प्रभू श्री राम यांनी लंकेवर आणि अयोध्येवर देखील ध्वज फडकाविला होता. वैराग्य आणि पुरुषार्थाचे ध्वज हे प्रतिक आहे, असे मत संतसाहित्याचे गाढे अभ्यासक विद्यावाचस्पती डॉ.रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले. 

विश्व हिंदू परिषद मठमंदिर संपर्क समितीच्यावतीने मंदिर तेथे ध्वज या अभियानांतर्गत पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील मंदिरात प्रत्येकी एक याप्रमाणे पाच हजार ध्वज उभारले जाणार आहेत. या अभियानाची सुरुवात श्रीराम मंदिर, तुळशीबाग येथे ध्वजपूजनाने झाली. यावेळी विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बाबूजी नाटेकर, श्री रामजी संस्थान तुळशीबागचे रामदास तुळशीबागवाले, विश्व हिंदू परिषद मठमंदिर संपर्क समिती पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख मनोहर ओक, पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री संजय मुरदाळे, नागनाथ बोंगरगे, सतिश कुलकर्णी आदी उपस्थित होते. 

डॉ.रामचंद्र देखणे म्हणाले, मंदिरे ही संकल्पना वेगळी असून ही संकल्पना सामाजिक अंगाने बांधली गेली आहे. पूर्वी मंदिरात न्यायनिवाडा, भजन, गायन यात्रा हे सगळे व्हायचे. त्यामुळे समाजातील लोक त्यानिमित्ताने एकत्र येत असत. त्यामुळे मंदिरे ही केवळ पुजेसाठी नव्हती. मंदिरे ही एकात्मता आणि अस्मितेचे प्रतिक आहेत. 
बाबूजी नाटेकर म्हणाले, मंदिर हा समाजाचा केंद्रबिंदू आणि श्रद्धास्थान आहे. देशात आनंद आणि निकोप व्यवस्था निर्माण होण्यासाठी या श्रद्धास्थानांची पुर्नस्थापना होणे गरजेचे आहे. समाज विस्कळीत करायचा असेल, तर भारतीयांची श्रद्धास्थाने मोडली पाहिजेत, हे परकीयांना माहित होते. त्यामुळे त्यांनी राजवाडे, महाल नाही तर, मंदिरांची तोडफोड केली. त्यामुळे मंदिरांची पुर्नस्थापना झाली तर भारताची अस्मिता पुन्हा निर्माण होईल. समाजप्रबोधन आणि जागृतीचे केंद्रस्थान मंदिर व्हायला हवे, असेही त्यांनी सांगितले. अभियानात सहभागी होण्याकरीता ९३७१०५७४५२, ९५७९८७८१३९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: