ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ‘संजीवनी’ शिष्यवृती

पुणे, दि. २५ –श्यामची आई फाऊंडेशन आणि उदय गुजर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी संजीवनी हा महत्वाकांक्षी उपक्रम चालू करण्यात आला आहे, याद्वारे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील १० वीच्या वर्गातील ६० विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच आर्थिकदृष्ट्या सहाय्य करीत त्यांना त्यांच्या करिअरचे ध्येय साध्य करण्यास मदत केली जाणार आहे.

मागील सलग ५ वर्षांपासून श्यामची आई फाउंडेशनने १० वीच्या १७ लाख विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य कल आणि अभिक्षमता चाचणी राबविण्यात महाराष्ट्र शासनाला सहकार्य केले आहे.

गेल्या वर्षी परीक्षेला बसलेल्या १७ लाख विद्यार्थ्यांपैकी ग्रामीण भागातील सरकारी शाळांमधील २९५ विद्यार्थ्यांनी मोजल्या जाणा-या चारही क्षमतांमध्ये उच्च अभिक्षमता दर्शविली आहे. यापैकी ६० विद्यार्थ्यांची राज्यभरातून निवड करणे आणि पुढील ३ ते ४ वर्षे शिक्षण घेण्यासाठी आणि त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात त्यांना आत्मनिर्भर बनण्यासाठी मार्गदर्शन करणे हे आमचे उद्दीष्ट आहे, असे उदय गुजर फाउंडेशनचे संचालक उदय गुजर या वेळी म्हणाले.

डॉ. रघुनाथ माशेलकर हे संजीवनी उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आणि सल्लागार आहेत आणि भविष्यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाधिष्ठीत शिक्षणाचे  मॉडेल वापरुन हा उपक्रम व्यापक करण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन मोलाचे असणार आहे. या उपक्रमातून आपल्या विद्यार्थ्यांना समान संधी, संसाधने आणि त्यांच्या आवडी व क्षमतेनुसार  उच्च शिक्षणाची संधी मिळेल, ज्यायोगे त्यांचे करिअर अर्थपूर्ण बनेल. परिणामस्वरूप एक सुरक्षित, आनंदी आणि समृद्ध राष्ट्र निर्माण होण्यास मदत होईल, असा आमचा विश्वास असल्याचेही त्यांनी नमूद केले.

श्यामची आई फाऊंडेशन (एसएएफ) ही एक तंत्रज्ञानाधिष्ठीत आणि संशोधनावर आधारित, स्वयंसेवी संस्था आहे. जी भारतातील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्वत:साठी सुयोग्य शैक्षणिक पर्यायाची निवड करण्यास सक्षम करते. इतकेच नाही तर याद्वारे विद्यार्थी स्वतःसाठी अर्थपूर्ण करिअर निर्माण करू शकतात. ‘राईट टू राईट एज्युकेशन’ (सुयोग्य शिक्षणाचा अधिकार) या दृष्टीकोनातून एसएएफ गेली सात वर्षे प्रयत्नशील असून भारतातील चार राज्यातील सुमारे ८५ लाख विद्यार्थी आणि ४१,००० शिक्षकांना याचा उत्तम प्रकारे फायदा झाला आहे.

उदय गुजर फाउंडेशन (यूजीएफ)ची स्थापना युवकांना, विशेषत: मुलींना आवश्यक ज्ञान देऊन आणि त्यांना उपयुक्त कौशल्यांनी सुसज्ज करून, केवळ अर्थपूर्ण रोजगारासाठीच नाही तर उद्योजकता निर्माण करण्यासाठी देखील सक्षम बनविण्याच्या दृष्टीने केली गेली होती. युजीएफने कौशल्य विकास केंद्रात शिकणाऱ्या सुमारे शंभर विद्यार्थ्यांसाठी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील (भोर जवळ) विंग या ठिकाणी पाच एकर जागेत तीन वसतिगृहे बांधली आहेत.

या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वर्षभरामध्ये तीन वेळा आणि तीन दिवसीय निवासी शिबीर आयोजित केले जाणार आहे. आवश्यकतेनुसार शिष्यवृत्ती देखील दिली जाईल पहिले निवासी शिबीर एप्रिल / मे २०२१ या महिन्यात घेण्यात येणार आहे. निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या शाळांमधील शिक्षकांना स्थानिक पातळीवर स्वयंसेवी तत्वावर या विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन करण्याची विनंती करण्यात येणार आहे. हा प्रवास सामूहिक आहे आणि या विद्यार्थ्यांसाठी संसाधने एकत्रित करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची मदत घेतली जाईल.

Leave a Reply

%d bloggers like this: