सागरी सुरक्षेबरोबरच सागरी शाश्वत विकासावर देखील भर दिला जावा

इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झरवेशन ऑफ नेचर संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. अशोक खोसला यांचे प्रतिपादन          

पुणे, दि. २५ –  समुद्र संपूर्ण जगाला एकमेकांशी जोडतो. जगभरातील व्यापार आणि वाहतूक ही प्रामुख्याने सागरी मार्गावरून होते. इतकेच नाही तर सागरी जैवविविधता, संसाधने ही देखील मनुष्यासाठी महत्त्वाची आहेत. त्यामुळे सागरी सुरक्षेबरोबरच सागरी शाश्वत विकासावर देखील भर द्यायला हवा, असे प्रतिपादन इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झरवेशन ऑफ नेचर (IUCN) संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. अशोक खोसला यांनी केले. अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस या विषयात काम करणा-या पुण्यातील मेरिटाईम रिसर्च सेंटर (एमआरसी) व नीरध्वनी टेक्नॉलॉजी यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मेरिटाईम रिसर्च सेंटरच्या वतीने आज ‘इंडो पॅसिफीक स्ट्रॅटेजिक स्पेस अॅण्ड सस्टेनेबल ब्लू फ्रँटियर्स – अ न्यू परस्पेक्टिव्ह बेस्ड ऑन दी युडीए’ या विषयावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये भारतीय तटरक्षक दलाचे माजी महासंचालक व्हाईस अॅडमिरल (निवृत्त) अनुराग थापलीया, जपानच्या टोकियो विद्यापिठाचे प्रो. तामाकी उरा, मेरिटाईम रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. (कमांडर) अर्नब दास, सल्लागार प्रफुल्ल तलेरा आदी उपस्थित होते.

या वेळी बोलताना डॉ. खोसला म्हणाले, “सागराचा विचार केला तर आपल्यासमोर आज प्रामुख्याने सामरिक, आर्थिक, पर्यावरण व संसाधनांशी संबंधित आव्हाने उभी आहेत. मात्र सागराचा आपल्याला होणारा उपयोग पाहता त्याच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने आपण काहीच करीत नाही ही चिंतेची बाब आहे. समुद्राचे वाढते आम्लीकरण, वितळणारे हिमनग, वाढती सागरी पातळी, प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण याकडे आज लक्ष देऊन त्यावर उपाय शोधणे महत्त्वाचे आहे. समुद्र ही पृथ्वीची फुफ्फुसे आहेत, त्यांद्वारे वातावरणातील ऑक्सिजन, कार्बनडाय ऑक्साईड संतुलन राहतो, फ्रेशवॉटर सायकलमध्ये ते महत्त्वाचा भाग पार पाडतात हे लक्षात घेत सागराचा नैसर्गिक व शाश्वत विकास करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. इतकेच नाही तर समुद्रातील संसाधनांच्या पुनरुज्जनासाठी देखील भरीव प्रयत्न व्हायला हवेत.”

भारताच्या आजूबाजूच्या देशांचा विचार केला तर हिंद महासागराचे सामरिक दृष्ट्या असलेले स्थान हे महत्त्वाचे असून ते टिकवायचे असेल तर अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस वाढविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे, असे मत यावेळी व्हाईस अॅडमिरल (निवृत्त) अनुराग थापलीया यांनी व्यक्त केले.              

त्सुनामी सारख्या घटना घडल्यानंतर आपण अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस यांसारख्या महत्त्वाच्या विषयांकडे वळतो हे दुर्भाग्यपूर्ण असल्याचे सांगत प्रो. तामाकी उरा यांनी २०१५ साली भारतात येऊन केलेल्या गंगा नदीतील डॉल्फिन संशोधनाबद्दल उपस्थितांना माहिती दिली. भारत आणि जपान या दोन्ही देशांनी एकत्रित येत सागरी संशोधन केल्यास त्याचा फायदा दोन्ही देशांना होईल असेही त्यांनी सांगितले.

प्रफुल्ल तालेरा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर अर्नब दास यांनी अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस या विषयाचे महत्त्व विषद करीत मेरिटाईम रिसर्च सेंटरच्या उपक्रमांची माहिती दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: