महाराष्ट्रातील ५२ लाख महाविद्यालयीन विद्यार्थी स्वराज्य दिन साजरा करणार- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

पुणे :  छत्रपती शिवाजी महाराजांमुळे देशाला दिशा मिळाली, ते व्यक्तिमत्व कायमस्वरुपी सगळ्यांसमोर रहावे आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा घराघरात पोहोचावी, याकरीता महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठ, महाविद्यालयांमधील ५२ लाख विद्यार्थी पुढील वर्षापासून स्वराज्य दिन साजरा करतील. महाविद्यालयांमध्ये शिवराज्याभिषेक दिन हा स्वराज्य दिन म्हणून साजरा होईल, याकरीता पुढील ८ दिवसात शासकीय अध्यादेश काढण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात केली. पुण्यातील गणेशोत्सवाप्रमाणे शिवजयंती महोत्सव समितीने सुरु केलेला शिवजयंती उत्सव स्वराज्यरथ सोहळा देखील जगभर प्रसिद्ध होईल, असे सांगत समितीचे आद्यप्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी केलेल्या कार्याची दखल घेत शासनाची देखील काही जबाबदारी असल्याचे सांगत त्यांनी ही घोषणा केली. 

शिवजयंती महोत्सव समिती तर्फे लालमहाल येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.सोहळ्याची सुरुवात पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या महिला भगिनींच्या हस्ते शिवरायांना औक्षण करुन झाली. यावेळी पुण्याचे सहपोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, समितीचे आद्य प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, जेष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. प्रताप परदेशी, आमदार दिलीप मोहिते, संग्राम थोपटे, भीमराव तापकीर, चेतन तुपे, सिध्दार्थ शिरोळे, संजय जगताप, प्रवीण परदेशी तसेच सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते लालमहालातील जिजाऊंच्या आणि शिवरायांच्या स्मारकाला पुष्पहार घालून जिजाऊ मॉं साहेब शहाजी महाराज शिवज्योत प्रज्वलन करण्यात आली. कार्यक्रमाला पारंपरिक पोशाखात उपस्थित महिला, लहानमुले, शिवभक्तांनी केलेला जय शिवाजी जय भवानीचा जयघोष अशा पवित्र वातावरणात शिवकाल पुन:श्च एकदा पुण्यामध्ये अवतरला. 

लालमहालपासून शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या पहिल्या भव्य अश्वारुढ स्मारकापर्यंत फुलांच्या पायघड्या घालत शिवज्योत नेण्यात आली. सोहळ्याचे यंदा ९ वे वर्ष आहे. श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते एसएसपीएमएस संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या पहिल्या भव्य अश्वारुढ स्मारकाला पुष्पहार अर्पण करुन सोहळ्याची सांगता करण्यात आली.

सोहळ्याचे आयोजन समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ललित शिंदे, दीपक घुले, रवींद्र कंक, दिग्वीजय जेधे, शंकर कडू, महेश मालुसरे, नीलेश जेधे, गोपी पवार, अनिल पवार, समीर जाधवराव, दीपक बांदल, किरण देसाई, मंदार मते, प्रवीणभैय्या गायकवाड, मयुरेश दळवी यांसह असंख्य स्वराज्यबांधवांनी केले होते.

* सलग १० व्या वर्षी  हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करुन शिवरायांना ईशान अमित गायकवाड यांनी दिली मानवंदना
शिवजयंतीला शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या विश्वातील पहिल्या भव्य अश्वारुढ स्मारकावर सलग १० व्या वर्षी  हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करुन ईशान अमित गायकवाड मानवंदना दिली. यावेळी ईशानच्या सोबत आई रिंकल व वडिल अमित सुरेश गायकवाड, सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरा करणारी ईशानची आत्या सुषमा संजय शिंदे तसेच पलाश शिंदे, रितीका जुनावणे, हंसीका जाधव, रेवा जोगदंड, शूर गायकवाड, वीरा गायकवाड, तन्वी दळवी, सिध्दी दळवी यांनी देखील हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली.

Leave a Reply

%d bloggers like this: