पोवाडयाचा कार्यक्रम करुन शाहिरांचा ‘सविनय कायदेभंग’

पुणे : ठेवूनी शिवरायांचे भान, पोवाडा गाऊन करु अभियान… शिवजयंती आणि पोवाडयाला बंदी ?…, पोवाडयासाठी काय पण… आणि म्हणे शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण… असे घोषणा देण्यासोबतच शाहिरांनी पारंपरिक वेशात पोवाडा सादर करुन सविनय कायदेभंग केला. शिवजयंती उत्सवात पोवाडा नाही गायचा तर केव्हा गायचा, अशी भावनाही यावेळी व्यक्त करण्यात आली.  

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे लालमहालाच्या सभागृहात आणि लालमहाल चौकात पोवाडा गायन करीत महाराष्ट्र शासनाच्या गृह खात्याने शिवजयंती उत्सवात पोवाडा गायला बंदी घातली आहे, त्याचा निषेध करण्यात आला. यावेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, शाहीर गणेश टोकेकर, अरुणकुमार बाभुळगावकर, ओंकार चिकणे, विनायक कालेकर, प्रा.संगीता मावळे, सुरेश तरलगट्टी आदी उपस्थित होते. पोलिसांनी यावेळी शाहिरांना अटक केली. 

शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, पोवाड्यांच्या कार्यक्रमावरील बंदी मागे घेण्यासाठी आवाहन / विनंती पत्र गृहमंत्र्यांना देऊनही योग्य आदेश न काढल्याने शाहिरीची ताकद दाखविण्यासाठी पोवाडा गायन करण्यात आले. पोवाड्यांवर बंदी घालणे म्हणजे ठाकरे सरकारच्या काळात राज्यात मोगलाई आली आहे का? असा सवालही त्यांनी केले. तसेच शिवरायांचे बालपण ज्या ठिकाणी गेले त्याच लालमहाल परिसरात पोवाडा सादर करुन आम्ही निषेध करीत असल्याचे त्यांनी सांगितले.      

Leave a Reply

%d bloggers like this: