‘युवा वॉरियर्स’मुळे तरुणांना व्यक्त होण्यास मिळणार व्यासपीठ – चंद्रकांत पाटील

पुणे : “करिअर आणि कौटुंबिक जीवनात व्यग्र झालेल्या तरुणांचे देशाशी, समाजाशी नाते जोडण्याचे काम व्हावे. त्यांच्यात राजकीय, सामाजिक भान आणि जाणीव वाढावी, यासाठी प्रयत्न करायला हवेत. भारतीय जनता युवा मोर्चाने सुरु केलेल्या या ‘युवा वॉरिअर्स’ अभियानातून या युवा पिढीला व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ मिळेल. त्यातून त्यांची जाणीव व प्रगल्भता वाढेल,” असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने तरुणाईला जोडण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘युवा वॉरियर्स’ अभियानाचा शुभारंभ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. कोंढवे-धावडे येथील दामिनी लॉन्समध्ये झालेल्या सोहळ्याप्रसंगी आमदार भीमराव तापकीर, भारतीय जनता युवा मोर्चाचे (भाजयुमो) प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, ‘भाजयुमो’चे प्रदेश उपाध्यक्ष व युवा वॉरिअर्स राज्य संयोजक अनुप मोरे, सरचिटणीस सुशील मेंगडे, भाजयुमो पुणे शहराध्यक्ष राघवेंद्र उर्फ बापू मानकर, पुणे जिल्हाध्यक्ष किरण दगडे पाटील, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संकेत चोंधे, पुणे शहर प्रभारी राजेंद्र साबळे, राहुल महाडिक, गणेश भेगडे, कार्यकारिणी सदस्य गणेश वर्पे, सचिन जायभाये, अजित कुलथे, सुशांत गाडे, निवेदिता एकबोटे आदी उपस्थित होते. ‘युवा वॉरियर्स’च्या लोगोचे, टी-शर्ट व टोपीचे अनावरण यावेळी करण्यात आले. अनोख्या पद्धतीने कमळाच्या पाकळ्यातून युवा वॉरियर्सचा लोगो सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, अटलबिहारी वाजपेयी आदी महापुरुषांचे कर्तृत्व या युवापिढीला समजून घेण्याची गरज आहे. आज समाजात आजूबाजूला अनेक अडचणी, प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी आपण काय योगदान देऊ शकतो, याचा विचार युवांनी केला पाहिजे. १८ ते २५ या वयोगटातील तरुणाईचे सळसळते रक्त असते. त्याला योग्य दिशा देऊन राष्ट्रहितासाठी ही शक्ती कार्यान्वित करायला हवी. स्वातंत्र्य लढ्यात युवकांचे मोठे योगदान होते. तसेच योगदान आजही या तरुणाईने द्यायला हवे. या पिढीला खरा इतिहास सांगण्याची, तसेच राष्ट्राशी, इतिहासाशी आणि संस्कृतीशी जोडण्याचे काम युवा मोर्चा करत आहे.”

“राज्यभर सर्व राजकीय, सामाजिक कार्यक्रम मोठ्या स्वरूपात होत असताना शिवजयंतीला परवानगी नाकारणे हे दुर्दैव आहे. कोरोनाच्या धोक्यामुळे काळजी घेऊन शिवजयंती साजरी करण्याची परवानगी द्यायला हवी होती. एका पक्षाचे अध्यक्ष गावोगाव जाऊन कार्यक्रम, मेळावे घेतात. त्यावर निर्बंध नाहीत. मात्र, शिवजयंतीला निर्बंध घातले जातात. अभिव्यक्त होणाऱ्या लोकांवर बंदी घालण्याची भाषा निंदनीय आहे. एल्गार परिषद होते. मात्र, पोवाडे चालत नाहीत. हिंदू धर्म हा सहनशील आणि सहिष्णू असल्याने सर्वधर्मसमभावाचे धडे देण्याचे केविलवाणे प्रयत्न अनेकजण करतात. त्यामुळे जाज्वल्य हिंदुत्व या युवाशक्तीमध्ये बिंबवण्याचा काम होण्याची आवश्यकता आहे,” असेही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले.

विक्रांत पाटील म्हणाले, “१८ ते २५ वयोगटातील युवा हा प्रगल्भ आणि ‘टेकनोसॅव्ही’ आहे. संवेदनशील तरुणांच्या मनात अनेक विषय घोळत असतात. त्यांना व्यक्त होण्यासाठी ‘युवा वॉरीअर्स’ हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. क्रांती घडवायची असेल तर विविध क्षेत्रातील युवा महत्वाचा आहे. युवा वॉरीअर्स सातत्यपूर्ण काम करत राहील आणि प्रत्येक विभागात दैदिप्यमान कामगिरी करत उज्जल भविष्याचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास वाटतो.”

अनुप मोरे म्हणाले, “रामराज्य परत यायला लागले आहे. युवा वॉरीअर्स हनुमानसेनेसारखे काम करेल. राज्यभर युवा वॉरियर्सच्या शाखांचे निर्माण करणार आहोत. ग्रामीण भागात प्रत्येक पंचायत समिती गणापर्यंत व शहरी भागात वॉर्ड स्तरापर्यंत शाखांचे निर्माण होईल. विविध क्षेत्रातील सातत्यपूर्ण उपक्रम करून युवांना जोडण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

भीमराव तापकीर आणि योगेश टिळेकर यांनी मनोगते व्यक्त केले. सुशील मेंगडे यांनी प्रास्ताविक केले. राघवेंद्र उर्फ बापू मानकर व किरण दगडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: