पद्मश्री नामदेव ढसाळ स्मृती पँथररत्न पुरस्काराचे वितरण

पुणे : महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समिती आणि आडकर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या 74व्या जयंतीनिमित्त पँथररत्न पुरस्कार पँथरनेते यशवंत नडगम यांना आज प्रदान करण्यात आला.

महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह अ‍ॅड. प्रमोद आडकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी नगरसेविका लता राजगुरू होत्या. कार्यक्रमाचे संयोजक विठ्ठल गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली.

पुरस्कार वितरणानंतर बोलताना अ‍ॅड. आडकर म्हणाले, नामदेव ढसाळ जसे राजकारणी होते तसेच साहित्यिक, कवीही होते. सामाजिक प्रश्नावर ते पोटतिडकीने बोलत. अन्यायाविरुद्ध कायम लढा देताना ते मानवी भावनांची जपणूकही करत. चांगला माणूस असणे ही जशी समाजासाठी उपयुक्त गोष्ट असते तशी माणसातील माणूस जागा असणेही गरजचे असते. समाजासाठी करीत असलेल्या कार्याबद्दल अ‍ॅड. आडकर यांनी नडगम यांचा गौरव केला.

पुरस्काराला उत्तर देताना नडगम म्हणाले, संघटनेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. या पुरस्कारामुळे संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळेल. तरुण पिढीने महापुरुषांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे.

लता राजगुरू यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना नडगम यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. सुरुवातीस रंगत-संगत प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष मैथिली आडकर यांनी महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पाहर अर्पण केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: