नृत्यप्रेमींसाठी वैभव आरेकर व सुशांत जाधव यांच्या ‘वेणूगान’ची पर्वणी


पुणे, दि. ८ -लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच प्रसिद्ध भरतनाट्यम कलाकार व नृत्यदिग्दर्शक वैभव आरेकर, नृत्य दिग्दर्शक सुशांत जाधव आपल्या नवीन संकल्पनेवर आधारित ‘वेणूगान’ हा नृत्याविष्कार घेऊन नृत्यप्रेमींच्या भेटीला येत आहेत. सांख्य डान्स कंपनीच्या वतीने येत्या शुक्रवार दि. १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.४५ वाजता जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमाच्या सशुल्क प्रवेशिका कार्यक्रमाच्या दिवशी बालगंधर्व येथेच उपलब्ध असणार आहेत.

आपल्या या नवीन कार्यक्रमाविषयी बोलताना वैभव आरेकर म्हणाले, “लॉकडाऊन काळात कलाकारांना देखील अनेक संकटांना सामोरे जावे लागले. त्यावर मात करीत आता कलाकार पुन्हा प्रेक्षकांच्या प्रत्यक्ष भेटीला येत आहेत. आम्ही देखील लॉकडाऊन दरम्यान एक वेगळा विषय घेत तयार केलेला ‘वेणूगान’ हा कार्यक्रम घेऊन रसिक प्रेक्षकांसमोर येत आहोत, याचा आम्हाला आनंद आहे. कार्यक्रम सुरु झाल्याने आता सगळीकडे पुन्हा पाहिल्यासारखे चैतन्य येऊन एक सकारात्मकता जाणवेल असा आमचा विश्वास आहे. रसिकांनी देखील यामध्ये सहभागी होत कलाकारांना प्रोत्साहन द्यावे व कला क्षेत्राला उभारी देण्याच्या दृष्टीने पुढाकार घ्यावा.”

येत्या १२ फेब्रुवारी रोजी होणा-या आमच्या ‘वेणूगान’ या कार्यक्रमात ‘कृष्ण’ या संकल्पनेवर सादरीकरण करण्यात येणार आहे. आजवर केवळ दैवत्व आणि साहसी दाखविल्या गेलेल्या कृष्णाचे मानवी रूप दाखविण्याचा प्रयत्न आम्ही यामध्ये केला आहे. त्याची सुख, दु:ख त्याच्या मानवी मनाचा हळवा कोपरा यावर यामध्ये सादरीकरण करण्यात आले आहे. शिवाय मृत्यूच्या अगोदर कृष्णाच्या मनात राधा, रुक्मिणी, अर्जुन, कुंती, गांधारी यांच्या निर्माण झालेल्या आठवणी यांचे वर्णन यामध्ये आहे. एखाद्या कोडयाप्रमाणे असलेले कृष्णाच्या आयुष्याचे हे पदर उलगडून दाखविण्याचा प्रयत्न आम्ही ‘वेणूगान’मधून करीत असल्याचे आरेकर यांनी सांगितले.

‘वेणूगान’साठी प्रो. वसंत देव यांनी लेखन केले असून स्वत: वैभव आरेकर यांनी नृत्यदिग्दर्शन व सादरीकरण केले आहे. दिग्दर्शन, वेशभूषा, सेट व प्रकाशयोजना यांचे संयोजन सुशांत जाधव यांनी, संगीत दिग्दर्शन सतीश कृष्णमूर्ती व कार्तिक हेबार यांनी तर मूळ थिएटर-दिग्दर्शन हे हेमंत हजारे यांनी केले आहे.

कार्यक्रमाच्या सशुल्क प्रवेशिका बालगंधर्व रंगमंदिर येथे कार्यक्रमाच्या दिवशीच सकाळी १० वाजल्यापासून उपलब्ध होऊ शकणार आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: