कोरोना काळात आरोग्य विभागाने चांगले काम केले – बाळासाहेब थोरात

पुणे, दि. २९ – कोरोना काळात आरोग्य विभागाने चांगल्या पद्धतीने काम केले. विभागाचे मंत्री म्हणून राजेश टोपे यांनी अनेक ठिकाणी जाऊन धीर दिला, त्यामुळे त्यांचे कौतुक होणे हे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेच्यावतीने स्व. ॲड रावसाहेब शिंदे यांचा स्मृतिदिन समारंभ आणि पुरस्कार प्रदान सोहळा आज एसएम जोशी सभागृह येथे आयोजित केला होता. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूण गुजराथी, पी. डी. पाटील, जेष्ठ पत्रकार मधुकर भावे, सचिन ईटकर आदी उपस्थित होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, सह्याद्री फार्मर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे, कवयित्री अनुराधा पाटील यांना स्व.ॲड. रावसाहेब शिंदे पुरस्कार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, अरूण गुजराथी, सह्याद्री फार्मर कंपनीचे अध्यक्ष
विलास शिंदे, कवयित्री अनुराधा पाटील यांची भाषणे झाली.

बाळासाहेब थोरात म्हणाले, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना कालावधीत अत्यंत सक्षमपणे कार्य केले आहे. त्यातच चांगले नियोजन करून कोरोना परिस्थिती हाताळली आहे. त्यामुळे लोकांमध्ये एक विश्वास तयार झाला. तसेच कृषी तज्ञ यांनी शेती क्षेत्रात दिशादर्शक काम केले. कवयित्री अनुराधा पाटील यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, जनतेची पहिली पायरी ही आरोग्य आहे. आरोग्य क्षेत्रात अनेक आव्हाने आहेत. त्यात खूप काही काम करण्यासारखे
आहे. यामध्ये सर्वांना संतुष्ट करता नाही आले तरी सेवा मात्र करता येऊ शकते. कोरोना हा किती भयावह आहे, हे कोणालाही माहिती नव्हते. त्यावेळी त्याला धैर्याने सामोरे जाण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे अशी आपली भूमिका होती. कोरोनाकाळात एनआयव्ही, हॉस्पिटल, हॉटस्पॉट परिसर अशा विविध ठिकाणी कोरोना पसरत होता. त्याठिकाणी जाऊन नियोजन करणे गरजेचे होते आणि त्यादृष्टिने काम केले आहे. या सर्व कामाचे डब्लुएचओने (जागतिक आरोग्य संघटनेने) कौतुक केले. कोरोना काळात टीमने काम केले. लोकांना विश्वास देणे गरजेचे होते. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम केले पाहिजे. त्यासाठी सर्व हॉस्पीटले सक्षम, चांगली केली पाहिजे. त्यानुसार कोरोनाच्या टेस्टमध्ये सहा वेळा काम केले. त्यासाठी काही वेळा दंडही आकारले आहेत. कोरोनाकाळात अभ्यास करून अनेक गोष्टीवर काम केले. हे सर्व टीमवर्क आहे, त्यातून चांगले काम झाले आहे.
कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम म्हणाले, चांगले काम होण्यासाठी चांगली टीम आवश्यक आहे. त्यामध्ये टीमचा प्रमुख हा महत्त्वाचा आहे. कोरोनाकाळात
राज्याच्या टीममध्ये राजेश टोपे हे चांगले कर्णधार लाभले म्हणून चांगले काम केले आहे. कृषीक्षेत्रात विलास शिंदे यांनी चांगले काम केले आहे. त्या
खात्याचा मी मंत्री आहे. त्यामुळे आम्हालाही अनेक गोष्टी शिकायला मिळणार आहेत. सेंद्रीय शेती आणि लोकांना एकत्र करून मोठी उलाढाल केली आहे, ही प्रेरणादायी बाब आहे. राज्यात असलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक ती मदत केली जाईल. त्यासाठी विकेल ते पिकेल ही योजना सुरू केली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन ईटकर यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: