Saturday, June 13, 2026
Business

पेपरलेस प्रक्रिया आणण्याकरीता ‘बॅंक ऑफ बडोदा’ने सादर केला ‘डिजिटल लेन्डिंग प्लॅटफॉर्म’

मुंबई –  देशातील सार्वजनिक क्षेत्रातील तिसर्‍या क्रमांकाची मोठी बॅंक असलेल्या ‘बँक ऑफ बडोदा’ने ‘डिजिटल लेन्डिंग प्लॅटफॉर्म’ सादर केला आहे. या सुविधेमुळे कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांना त्यांच्या सोयीच्या ठिकाणी व सोयीस्कर वेळी पेपरलेस प्रक्रियेद्वारे डिजिटल स्वरुपात कर्ज मिळू शकणार आहे.

ऑफलाइन किंवा ऑनलाइन भागीदार चॅनेलद्वारे कोणतीही गोष्ट खरेदी करण्यासाठी निवडक विद्यमान ग्राहकांना पूर्व-मंजुरी असलेले सूक्ष्म वैयक्तिक कर्ज देण्यात येते व सुलभ इएमआयमध्ये ते फेडण्याचा प्रस्ताव देण्यात येतो. ग्राहकांना त्यांच्या बचत खात्यात ही कर्जाची रक्कम मिळू शकते. ‘एम-कनेक्ट +’ या बँकेच्या ‘मोबाइल बँकिंग अ‍ॅप’च्या माध्यमातून ही कर्जाऊ रक्कम 60 सेकंदांमध्ये त्यांच्या हाती येऊ शकते. 3 ते 18 महिन्यांच्या कालावधीत ती फेडण्याचा पर्याय ग्राहक निवडू शकतात.

बॅंकेचे कार्यकारी संचालक विक्रमादित्य सिंह खिची म्हणाले, “ग्राहकांना एकमेवाद्वितीय अनुभव देणे व वैयक्तिकृत सेवा पुरविणे, तसेच डिजिटलायझेशनद्वारे कर्ज व्यवसायाचे प्रमाण वाढविणे, हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. बँकेने अत्यंत कार्यक्षम व नाविन्यपूर्ण वातावरण तयार करुन स्वतःला डिजिटल बनवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे बँकेला आपली उत्पादने कमीत कमी वेळेत बाजारात उतरविता येत आहेत. रिटेल, एमएसएमई आणि कृषी विभागांमध्ये ‘डिजिटल फर्स्ट’ माध्यमातून कर्जे देण्याचे धोरण राबवून, पुढील 5 वर्षांत बॅंकिंग उद्योगापेक्षाही दीडपटीने वाढण्याचे व वार्षिक 16 टक्क्यांची वाढ साध्य करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”

या ‘डिजिटल लेन्डिंग प्लॅटफॉर्म’मधून कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय 30 मिनिटांत गृह कर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्जासाठी ‘तात्विक मंजुरी’ मिळू शकते. अर्जदाराच्या आर्थिक प्रोफाइलच्या विविध स्त्रोतांच्या आधारे डिजिटल कर्जाची प्रक्रिया केली जाते. अर्जदारास 4 साध्या टप्प्यांनंतर ‘तात्त्विक मंजुरी’ मिळू शकते. कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारास ही सुविधा वेबसाइट, मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि सोशल मीडिया या विविध माध्यमांमधून मिळू शकेल.

‘डिजिटल लेन्डिंग प्लॅटफॉर्म’द्वारे मुदत ठेवींवरही ऑनलाईन कर्जाची सुविधा मिळेल. ग्राहकांच्या ऑनलाईन मुदत ठेवींवर मोबाईल बॅंकिंग व नेट बॅंकिंग यांच्या माध्यमातून त्वरीत कर्ज या सुविधेमुळे मिळू शकते. 

‘डिजिटल लेन्डिंग प्लॅटफॉर्म’ सादर केल्यानंतर, आता यापुढे व्यक्तिगत कर्जाचे वितरण पूर्णपणे डिजिटल पद्धतीनेच केले जाईल, त्यानंतर एमएसएमई आणि कृषी यांच्यासाठीची कर्जेही डिजिटल स्वरुपात देता येतील, असा बॅंकेला विश्वास आहे. आगामी 5 वर्षांच्या काळात रिटेल कर्ज देण्यात डिजिटल पद्धतींचा वाटा 74 टक्क्यांपर्यंत वाढेल, असाही बॅंकेचा अंदाज आहे.

बँक ऑफ बडोदाचे मुख्य सरव्यवस्थापक डॉ. रामजस यादव म्हणाले, “आम्ही आमच्या डिजिटल प्रवासाला गती देण्याचा, तसेच बँकेचे रुपांतर संपूर्णपणे डिजिटाईज्ड संस्थेत करण्याकरीता गुंतवणुकीचा, नाविन्यता आणण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहोत. ‘डिजिटल लेन्डिंग प्लॅटफॉर्म’मुळे बॅकेला बिगर-कॉर्पोरेट कर्जवितरणाचा आकडा दुप्पट करण्यास मदत होणार आहे.”

‘बँक ऑफ बडोदा’चे फिनटेक, मोबिलिटी व डिजिटल लेन्डिंग विभागाचे प्रमुख अखिल हांडा म्हणाले, “आमची विद्यमान कामकाजाची पद्धत ‘डिजिटल फर्स्ट’ मॉडेलनुसार चालावी, असे आमचे ध्येय आहे. ते साध्य करण्याकरीता व आमच्या डिजिटल ग्राहकवर्गाला चांगली सेवा देण्याकरीता आम्ही नवीन उत्पादने तातडीने सादर करणार आहोत.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading