Thursday, September 3, 2026
PUNE

संदर्भसंपन्नता आणि प्रसन्नतेचा सुंदर मिलाफ पुलंच्या वक्तृत्वात – प्रा मिलिंद जोशी

पुणे, दि. २८ – कोट्या, विनोद, स्मरणातल्या सुंदर काव्यपंक्ती आणि गोष्टी यांची सुरेख उधळण करीत, उपरोध, उपहास, अत्युक्ती, ऊनोक्ती यांची पखरण करीत तर कधी हजरजबाबीपणा आणि चतुरालाप करीत श्रोत्यांना खळखळून हसविणाऱ्या पुलंच्या वक्तृत्वात संदर्भसंपन्नता आणि प्रसन्नतेचा सुंदर मिलाफ होता असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.

राम नगरकर कला अकादमी, पुणेने पुलंच्या १०१ व्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या शोध युवा वक्त्यांचा या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते
प्रा जोशी पुढे म्हणाले, “माहितीचे अफाट भांडार असलेली पुलंची भाषणे चिंतनशीलतेचा सुंदर प्रत्यय देणारी आहेत. पुलंच्या ठायी विदवत्ता होती, पण रुक्षता नव्हती. त्यांची भाषणे ऐकताना एका गोष्टी वेल्हाळ, रसिक आणि रसील्या व्यक्तिमत्वाशी आपण संवाद साधत आहोत असा आनंद श्रोत्यांना मिळत असे. पुलंच्या वक्तृत्वाने मराठी रसिकत्वाचे भरणपोषण केले आणि महाराष्ट्राची श्रवणसंस्कृती श्रीमंत केली.जीवनातल्या विसंगतीकडे दयाबुद्धीने पाहणारा पुलंचा विनोद हा जखमा करणारा किंवा बोचकारणारा नव्हता तर गुदगुल्या करून हसवणारा होता. पुलंचा विनोद अदबीने आणि सभ्यतेने समाज जीवनात वावरला
वंदन राम नगरकर म्हणाले की ” माझे वडील आणि पुलं यांचे ऋणानुबंध होते, ‘रामनगरी’ या आत्मचरित्राला पुलं ची प्रस्तावना होती”

स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे – प्रथम क्रमांक – कौशिक कुलकर्णी , द्वितीय- स्नेहा सोनोने, तृतीय (विभागून) पुष्कराज कृष्णा सैद आणि ओंकार गानबोटे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading