Tuesday, June 16, 2026
PUNE

गणेश मंडळांनी केली कातकरी पाडयांची दिवाळी गोड

पुणे : दिवाळीचा फराळ व पणत्यांचा लखलखाट हे शब्द कोणाच्या तरी तोंडून ऐकणारी कातकरी समाजाची वस्ती आकाशकंदील, फराळ आणि पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघाली. पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पौडमध्ये डोंगर द-यामध्ये राहणारे कातकरी समाजातील शेतमजूर दिवाळीनिमित्त आयोजित आनंदोत्सवात उत्साहाने सहभागी झाले होते. तर चिमुकल्यांनी कधीही न पाहिलेले आकाशकंदील घरावर लावून दिवाळीचा मनमुराद आनंद लुटला.
साईनाथ मंडळ ट्रस्ट बुधवार पेठ, राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट, वीर शिवराज मित्र मंडळ गुरुवार पेठ, नवज्योत मित्र मंडळ येरवडा, युगंधर मित्र मंडळ आनंद नगर या पाच गणेशोत्सव मंडळांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुळशी तालुक्यातील जामगाव, दिसली, शेरे व माले अशा चार गावांमधील कातकरी वस्तीवर दिवाळी साजरी करण्यात आली. पियुष शाह, संकेत निंबाळकर, अभिषेक निंबाळकर, स्वप्नील दळवी, निलेश पाटसकर, चैतन्य काळे, किरण सोनिवाल, मोहित झांजले, चैतन्य सिन्नरकर, अमित जाधव, अक्षय रजपूत, मयूर पोटे, स्वरूप देवरुखकर, रवी जाधव आदी यावेळी उपस्थित होते. 
कातकरी वस्तींवरील ८६ कुटुंबातील लोकांसोबत कार्यकर्त्यांनी यंदाची दिवाळी साजरी केली. प्रत्येकाच्या घरासमोर कंदील, खायला फराळ व कार्यकर्त्यांच्या आपुलकीने सर्व कातकरी बांधव भारावून गेले होते. चकली, शंकरपाळी, चिवडा, लाडू, करंजी, फ्रायम्स, मिक्स फरसाण इत्यादी पदार्थ त्यांना देण्यात आले. तर, लहान मुलांना छोटे कंदील दिल्यानंतर त्यांचा डोळ्यात वेगळाच आनंद दिसल्याच्या भावना गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. अनेक गावांमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठया प्रमाणात दिवाळी साजरी झाली. फराळाच्या पदार्थांची नावे देखील माहिती नसल्याने हे पदार्थ त्यांच्या घरी होत नव्हते. परंतु पुणेकरांनी साज-या केलेल्या दिवाळीमुळे वस्तीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

                     

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading