योग्य आहार, नियमीत योग व व्यायामयुक्त जीवनशैली शारिरीक व मानसिक रोगांविरुद्ध प्रभावी औषध

पुणे : विश्वानंद केंद्रच्यावतीने कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर व लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य नागरिकांच्या मानसिक व शारिरीक आरोग्यावर झालेल्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. 
केंद्रामधील अधिकारी वैद्य अजित मंडलेचा, वैद्य गौस मुजावर यांच्या निरीक्षणाखाली सर्वेक्षण व संशोधनाचे काम पूर्ण करण्यात आले. याकरीता वैद्य मनोज ठाकूर, वैद्य सर्वेश कुलकर्णी, डॉ.दीपक फाल्गुने, डॉ. एम.जी. सय्यद यांनी मार्गदर्शन केले. आॅनलाईन पद्धतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सहकारनगर, कात्रज, बिबवेवाडी, सातारा रस्ता, धनकवडी, कोंढवा यांसह शहराच्या विविध भागांतील सुमारे ४०० नागरिकांचा सहभाग होता.
लॉकडाऊनच्या काळात बदलेल्या नियमांमुळे नागरिकांच्या जीवनशैलीमध्ये अमूलाग्र बदल झाला. नागरिकांनी पारंपारिक पद्धतीचा आहार, नियमीत व्यायाम व योग, आवश्यक झोप व विश्रांती या बाबीचा अवलंब जीवनशैलीत केल्यामुळे ८८ टक्के लोकांमध्ये कोणत्याही नवीन स्वरुपाचा आजार किंवा लक्षणे जाणवली नसल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे. त्यामुळे शारिरीक व मानसिक रोगांविस्द्ध आयुर्वेद जीवनशैलीचा अवलंब केल्यास निरोगी राहणे शक्य असल्याचे दिसून आले आहे. सर्वेक्षणामध्ये २२ टक्के नागरिकांना रक्तदाब, डायबेटिस इत्यादी प्रकारचे जुने आजार होते. त्यापैकी २० टक्के लोकांचा आजार लॉकडाऊनमध्ये बळावला होता.
सर्वेक्षणामध्ये सहभागींपैकी १२ टक्के लोकांना नवीन स्वरूपाचे आजार किंवा लक्षणे जाणवली. ज्या सहभागीमध्ये सर्दी, डोकेदुखी, इ. सौम्य लक्षणे जाणवली. त्यांनी आयुर्वेदामध्ये वर्णन असलेले सुंठ, मिरे, गवती चहा, पुदिना इत्यादी पदार्थांचा वापर करण्यास प्राधान्य दिले. याकाळात घरातील साधनांचा वापर करून वर्क फ्रॉम होम सुरु झाले. ३७% लोक घरामधून आॅफिसचे काम करत होते. बदललेल्या जीवनशैलीच्या परिणामांमुळे यापैकी ४१ टक्के सहभागींना मानसिक ताण, २६ टक्के लोकांना हाडांचे सांध्याचे आजार, आणि मांस पेशी वेदना, तर १५ टक्के लोकांमध्ये कौटुंबिक वादविवाद इत्यादी प्रकारचे त्रास दिसून आले.वैद्य गौस मुजावर म्हणाले, कोरोनाच्या काळात अनेकांची जीवनशैली बदलेली दिसून आली. योग्य आहार, नियमित व्यायाम व योग, मानसिक ताणाचे नियोजन आणि योग्य प्रमाणात झोप अशा बाबींचा दैनंदिन जीवनात समावेश असेल तर चिरकाळ निरोगी राहता येते असा निष्कर्ष निघाला.  

Leave a Reply

%d bloggers like this: