fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

माध्यमिक शिक्षणात परदेशी भाषा शिकविणे गरजेचे – डॉ.दीपक शिकारपूर

पुणे : आजपर्यंत शाळा-महाविद्यालयांमध्ये भौतिक शिक्षणावर भर दिला जात होता. मात्र, आता कोरोनानंतरच्या बदलत्या काळात २०२१ पासून या शिक्षण पद्धतीत बदल होणार असून व्हर्च्युअलायझेशन आणि सॅनिटायझेशन हे प्रवाह जीवनात मोठया प्रमाणात येणार आहेत. कोरोनाच्या काळात अनेकांचे व्यवसाय-नोक-या गेल्या असून यापुढे विद्यार्थ्यांचा कल आणि समाजाची गरज ओळखून शिक्षण द्यावे लागेल. त्याकरीता माध्यमिक शाळांमध्ये परदेशी भाषा शिकविणे गरजेचे आहे. जपानसारख्या देशांमध्ये नोक-या उपलब्ध आहेत आणि पुढील २० वर्षे नोक-या मिळण्याची स्थिती अशीच राहिल, असे मत ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ.दीपक शिकारपूर यांनी व्यक्त केले. 
पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अमृतपेढी स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद कार्यालयात आयोजित करण्यात आला. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख, माजी नगरसेविका ज्योत्स्ना सरदेशपांडे, ज्येष्ठ मार्गदर्शक बाबा कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष संजय सातपुते, उपाध्यक्षा विद्या पवार, मानद सचिव अंजली गोरे, खजिनदार सुभाष ससाणे आदी उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या माजी सभासदांचा सत्कार करण्यात आला. 
डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, शिक्षक हा समाजाचा महत्वाचा घटक मानला जातो. ज्या देशात शिक्षक व शिक्षणाला महत्त्व असते, तो देश ख-या अर्थाने विकसित होतो. आजच्या बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण पद्धतीत देखील बदल करणे गरजेचे आहे. लॅपटॉप, मोबाईल सारखी साधने आणखी १० वर्षांनी बदलतील आणि आणखी वेगळे तंत्रज्ञान येईल. त्यामुळे आपण काळानुरुप तंत्रज्ञान व साधनांचा शिक्षणात वापर करायला हवा. 
मुरलीधर मोहोळ म्हणाले, चांगला माणूस म्हणून जगण्याची शिकवण शाळा व शिक्षकांकडून मिळते. समाजाला दिशा देत सुसंस्कृत पिढी घडविण्याचे काम शिक्षक करतात. आज पतपेढी, क्रेडीट सोसायटी व बँकांची विश्वासार्हता कमी होत असतानाच शिक्षकांसाठी कार्यरत असलेली ही पतपेढी सलग ७५ वर्षे उत्कृष्टपणे काम करीत आहे. कोरोना काळात देखील शिक्षकांनी उत्तम काम करुन ज्ञानदानासोबत समाजाप्रती असलेले कर्तव्य पार पाडले आहे. 
संजय सातपुते म्हणाले, स्वातंत्र्यपूर्ण काळापासून सन १९४५ साली शिक्षकांना मदत करण्याच्या दृष्टीने पतपेढीची स्थापन झाली. मॉडर्न हायस्कूलमधून या कार्याचा श्रीगणेशा झाला. आजमितीस पुण्यातील १९० शाळांमधील शिक्षक संस्थेशी जोडले गेले आहेत. यापुढेही शिक्षक पतपेढीही केवळ शिक्षकांची पत सुधारण्याचे नाही, तर समाजामध्ये चांगले कार्य करण्यासाठी देखील प्रयत्न करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. विजय कचरे यांनी सूत्रसंचालन केले. विद्या पवार यांनी आभार मानले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading