पीएमपीतून आजमितीस २ लाखापेक्षा जास्त प्रवाशांना सेवा हे कर्मचाऱ्यांचे यश – पीएमपीचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र जगताप

पुणे : कोरोनाच्या संकटामुळे ओढावलेल्या लॉकडाऊनमध्ये महानगरपालिकांनी पीएमपीच्या कर्मचा-यांना जी कामे सांगितली, ती कामे सगळ्यांनी जबाबदारीने पार पाडली. लॉकडाऊनपूर्वी पीएमपीतून दररोज १० लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करीत होते. मात्र, लॉकडाऊनमध्ये सेवा बंद झाल्याने आर्थिक तुटवडा झाला. आजमितीस पीएमपीतून २ लाखापेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत असून दररोज ३० लाख रुपये उत्पन्न गोळा होत आहेत, ही संख्या टप्याटप्याने वाढेल असा विश्वास व्यक्त करीत हे पीएमपी कर्मचा-यांचे यश असल्याचे पीएमपीएमएलचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र जगताप यांनी सांगितले. 
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित शारदीय नवरात्र महोत्सवात स्वारगेट येथील पीएमपी मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात कोरोना काळात मृतदेहांची ने-आण करणारे कर्मचारी, कैलास व येरवडा स्मशानभूमीतील कर्मचारी व पोलिसांचा सन्मान आणि पीपीई किट देण्यात आले. यावेळी पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, मंदिराचे विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, नगरसेवक प्रविण चोरबोले, हेमंत अर्नाळकर, तुकाराम पवार, राजेश रंजन, संजय खंडेलवाल, सुनिल बिस्त आदी उपस्थित होते. ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल आणि प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. 
डॉ.राजेंद्र जगताप म्हणाले, कोविड काळात पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात प्रवाशांची ने-आण करण्यासाठी ३०० बसेस उपलब्ध होत्या. रेल्वेने आलेल्या कामगारांना योग्य स्थळी पोहोचविण्यासाठी देखील रेल्वे स्थानकावरुन पीएमपीने सेवा दिली. पुष्पक आणि रुग्णवाहिकेच्या माध्यमातून देखील काम केले. नेहमीपेक्षा वेगळी सेवा देता आली, याचा आम्हाला आनंद आहे. आता परिस्थिती सुधारत असून लवकरच अधिक चांगली सेवा देऊ, असेही त्यांनी सांगितले. 
विक्रम कुमार म्हणाले, सर्व प्रकारे प्रयत्न करुन कोविडचा प्रभाव कमी करु. तसेच कर्मचा-यांच्या सहकार्याने यावर मात करु. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणे हे अहोरात्र काम करीत संघटनशक्तीचे यश आहे. 
हेमंत रासने म्हणाले, जगात एकाच वेळ सर्वत्र संसर्ग झालेल्या रोगाची परिस्थिती आपण अनुभविली. केंद्र सरकारच्या अहवालानुसार डिसेंबर, जानेवारी महिन्यात पुन्हा लाट येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने आपण काळजी घेत आहोत. कोणत्याही कामाबाबत टिका करणे सोपे असते, पण काम करणे अवघड असते. पीएमपी कर्मचा-यांनी कर्तव्य भावनेतून केलेले काम हे ईश्वरी कार्य आहे. त्यामुळे त्यांना महालक्ष्मी मंदिर ट्रस्टने सन्मानित करणे हे देखील कौतुकास्पद आहे. 
अ‍ॅड.प्रताप परदेशी म्हणाले, पीएमपी कर्मचा-यांनी कोविड काळात उत्तम काम केले आहे. रुग्णाचे नातेवाईक देखील त्यांच्या मृतदेहाजवळ येत नसताना, या कर्मचा-यांनी आपुलकीच्या भावनेने कार्य केले. त्यामुळे आम्ही त्यांचा सन्मान करीत माणुसकीच्या भावनेने देवीची पूजा करण्याचा प्रयत्न करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले. नगरसेवक प्रविण चोरबोले यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: