अखेर ठरलं! एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार

मुंबई – भाजपाचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या शुक्रवारी दुपारी २ वाजता खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली.

जयंत पाटील म्हणाले, ‘भारतीय जनता पक्षाचे गेले तीन-साडेतीन दशके नेतृत्त्व करणारे, अनेक वर्ष काम करून भाजपाला बळ देणारे असे एकनाथराव खडसे यांनी त्यांचा पक्ष सोडलेला आहे, असे मला थोड्या वेळापूर्वी सांगितले. त्यांनी भाजपाचा त्याग केलेला असल्यामुळे शुक्रवारी दुपारी २ वाजता खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं बळ वाढेल असा मला विश्वास आहे.’

त्याचबरोबर ‘भाजपात त्यांच्यावर सतत जो अन्याय होतोय तो महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या लोकांनी पाहिलेला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पक्षाचा त्याग केला आहे’, असे म्हणत ‘एक अनेक वर्षाचा अनुभवी नेता, अनेक मुद्द्यांशी संबंधित काम करून महाराष्ट्रातल्या विविध विषयांचा अभ्यास असणारा नेता हा राष्ट्रवादीमध्ये येतोय त्यांचं स्वागत आम्ही शुक्रवारी दुपारी २ वाजता करू’, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

महत्त्वाचे म्हणजे खडसेंबरोबर येण्याची बऱ्याच लोकांची इच्छा आहे, माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या संपर्कात बरेच आमदार आहेत, असे विधानही जयंत पाटील यांनी यावेळी केले. ते म्हणाले, ‘परंतु सध्या कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे आमदारांना राष्ट्रवादीत यायचं असेल तर त्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यांनी राजीनामा दिला तर कोरोना संकटामुळे पोटनिवडणुका होणं शक्य नाही. दहा-बारा ठिकाणी पोटनिवडणुका घेणं शक्य नाही. त्यामुळे तूर्तास या आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत प्रवेश मिळणार नाही. कोरोनाचं संकट गेल्यावर ते पक्षात येतीलच’, असं सूचक विधान पाटील यांनी केलं.

Leave a Reply

%d bloggers like this: