भोगायला शिकवणाऱ्या वस्तूंपेक्षा, जगायला शिकवणारी पुस्तकं महत्त्वाची – प्रा. कृष्णात खोत

पुस्तकांच गाव, भिलार, दि. १५ : भोगायला शिकवणाऱ्या चंगळवादी वस्तूंपेक्षा जगायला शिकवणाऱ्या पुस्तकांचं महत्त्व आपल्या आयुष्यात अधिक असायला हवं, असा मौलिक विचार सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. कृष्णात खोत यांनी, पुस्तकांच्या गावाच्या वतीने आयोजित केलेल्या व्हर्च्युअल कार्यक्रमात मांडला. पुस्तकांचं गाव, भिलार या प्रकल्पाच्या वतीने वाचन प्रेरणा दिनानिमित्त (१५ऑक्टोबर) ‘व्हर्च्युअल अभिवाचन आणि व्याख्यानाचा’ कार्यक्रम योजण्यात आला होता. या आभासी कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रा. खोत यांनी उपस्थितांशी संवाद साधला. साहित्यिक आणि वाचक यांचे आंतरसंबंध उलगडून सांगतानाच, पुस्तकप्रेमाचा दुष्काळ संपवणे, हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. माणसांपेक्षा भरवशाची असणारी पुस्तकं माणसाला सामान्यत्वाकडून असामान्यतत्वाकडे नेतात, असे प्रतिपादन प्रा. खोत यांनी केले.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी त्यांचे सार्थ स्मरण करण्यासाठी योजलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध भागांतील १५ अभिवाचकांनी सादरीकरण केले. श्री. विश्वनाथ भिलारे, श्री. गणपत पारठे, श्रीमती संगीता खरात, श्री. पुरुषोत्तम माने, कु. समीक्षा जाधव, श्री. शशिकांत भिलारे (सर्व भिलार) या अभिवाचकांसह श्रीमती जयश्री तेली (गडहिंग्लज, कोल्हापूर), अभिजित कदम (तुंग, सांगली), वैष्णवी जाधव (सांगली), मानस टेकाळे, मिलिंद पाध्ये (दोघे पुणे), सुप्रिम बरडे (जळगाव), रोहित धेंडे (ठाणे), शुभांगी ओतुरकर (कल्याण), डॉ. अमृता इंदूरकर (नागपूर) या अभिवाचकांनी सहभाग नोंदवला.

माणूस केलंत तुम्ही मला ही पाडगावकरांची कविता, नटसम्राट नाटकातील सुप्रसिद्ध स्वगत, व्यंकटेश माडगूळकरांच्या माणदेशी माणसांमधील व्यक्तिचित्र, शामची आई – वपुर्झा – शोध कादंबरी  या सुप्रसिद्ध पुस्तकांमधले समर्पक उतारे, लोककला – इतिहास – उद्योजकता – स्त्रीसाहित्यातील कथा… असे विविधांगी साहित्य श्रोत्यांनी अनुभवले.

भिलारसह विविध भागांतील सर्वसामान्य वाचनप्रेमी वाचकांनी सहभाग नोंदवला. यातून प्रकल्पाचे वाचनप्रसाराचे उद्दिष्ट साध्य होते आहे, असे मत प्रा. खोत यांनी माडले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रकल्प व्यवस्थापक विनय मावळणकर यांनी प्रा. कृष्णात खोत यांच्यासह अभिवाचकांचे आणि श्रोत्यांचे आभार मानले. तसेच आगामी उपक्रमांत सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

‘पुस्तक वाचा, आम्हाला कळवा’  आवाहनास प्रचंड प्रतिसाद

‘आवर्जून पुस्तक वाचा, आम्हाला कळवा’ या प्रकल्पाने केलेल्या आवाहानसही प्रचंड प्रतिसाद मिळाला असून दि. १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत सुमारे २०० लोकांचे वाचन तपशील (पुस्तकाचं नाव, लेखक व प्रकाशकाचे नाव, पृष्ठसंख्या, वाचनाचा वेळ इ.) प्रकल्प कार्यालयास प्राप्त झाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील वाचकांनी सुमारे २ तास ते १५ तास वाचन केले असून; वाचकांनी छावा, प्रकाशवाटा, महानंदा, चहाटळकी, ट्रेन टु पाकिस्तान, श्रीसखी राज्ञी महाराणी येसूबाई, एक होता कार्व्हर, इस्रयालची मोसाद, जागर, मुत्युंजय, गरुडझेप, मुसाफिर, इक्ष्वाकुचे वंशज, अर्धविराम… अशा विविध प्रकारच्या पुस्तकांचा आनंद घेतला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: